पुणे: पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभांसाठी वापरता येणारी मैदाने, चौक सभा, कोपरा सभा तसेच सार्वजनिक जागांच्या वापरासंबंधीचे दर आणि अटी-शर्ती महापालिका प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. प्रचारासाठी महापालिकेच्या अखत्यारीतील विविध मैदाने, शाळांची मैदाने, मोकळ्या जागा व चौकांचा वापर करता येणार असून, त्यासाठी निश्चित शुल्क आकारले जाणार आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या ताब्यातील सर्व मैदाने, प्राथमिक व माध्यमिक शाळांची मैदाने तसेच उद्याने प्रचार सभांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये आर्मी सप्लाय डेपो मैदान, स्वारगेट परिसरातील मैदाने तसेच शाळांच्या आवारातील मोकळ्या जागांचा समावेश आहे. मात्र, या ठिकाणी प्रचार करताना महापालिकेने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहणार आहे. प्रचारासाठी कोणत्याही स्वरूपात कायमस्वरूपी बांधकाम, खांब उभारणे, पोस्टर किंवा जाहिराती लावण्यास मनाई केली आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, चौक सभांसाठीचे शुल्क लोकसंख्येच्या सरासरी अंदाजावर निश्चित केले आहे. चार ते पाच हजार लोकसंख्येच्या चौक सभेसाठी 2 हजार चौरस मीटर क्षेत्र गृहीत धरून प्रति चौरस मीटर दोन रुपये दराने शुल्क आकारले जाणार आहे. यानुसार सभेसाठी 18 हजार रुपये, साफसफाईसाठी 2 हजार रुपये आणि 2 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे.
कोपरा सभेसाठी दोन ते अडीच हजार लोकसंख्या असलेल्या परिसरात सुमारे 600 चौरस मीटर क्षेत्र वापरण्यास परवानगी देण्यात येणार आहे. यासाठी प्रति चौरस मीटर दोन रुपये दराने 6 हजार 200 रुपये सभेकरिता शुल्क, 2 हजार रुपये साफसफाई शुल्क आणि 4 हजार रुपये अनामत रक्कम आकारली जाणार आहे. महापालिकेच्या ताब्यातील आर्मी सप्लाय डेपो मैदान, शाळांची मैदाने व इतर मोकळ्या जागांसाठी मागणीनुसार शुल्क आकारण्यात येणार असून, दर प्रति चौरस मीटर दोन रुपये इतका राहील. या ठिकाणी सभा घेण्यासाठी परवानगी घेताना प्रतिदिवस भाड्याच्या 50 टक्के रक्कम अनामत म्हणून जमा करावी लागणार आहे.
प्रचार सभांसाठी परवानगी मिळविण्यासाठी उमेदवार किंवा राजकीय पक्षांनी संबंधित विभागाकडे अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जासोबत महापालिकेच्या विविध विभागांकडून तसेच पोलिस विशेष शाखेकडून उपलब्ध जागांची यादी, भाडे शुल्क, अनामत रक्कम व साफसफाई शुल्काची माहिती दिली जाणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक पुणे महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. रस्ता, चौक किंवा मोकळ्या जागेत पूर्वपरवानगीशिवाय सभा घेता येणार नाही. वाहतूक पोलिस आणि स्थानिक पोलिस विभागाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असेल. सभेसाठी आवश्यकतेनुसार 10 बाय 10 फूट आकाराचा तात्पुरता स्टेज उभारता येईल. मात्र, त्यामुळे रस्ता किंवा पदपथावर अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे आगामी निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी ठोस नियमावली लागू होणार असून, उमेदवारांना निश्चित चौकटीतच प्रचार करावा लागणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना परवानगी रद्द करण्याचा अधिकार राहणार आहे.
एकाच ठिकाणी अनेक प्रचार सभांना परवानगी नाही
प्रचारादरम्यान रस्ते किंवा पदपथ खोदून नुकसान केल्यास प्रतिखड्डा 2 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आचारसंहितेचे पालन करणे सर्व उमेदवारांना बंधनकारक राहणार आहे. एकाच ठिकाणी एकाच वेळी एकापेक्षा अधिक पक्षांच्या प्रचार सभांना परवानगी दिली जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.