पुणे: पुण्यासह राज्यातील तब्बल 29 महानगरपालिकांच्या रखडलेल्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याने पुणे महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले. 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी व अंतिम निकाल जाहीर होणार आहेत. भाजपने तीन हजार कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ करून प्रचाराचा नारळ फोडला आहे. तर शिवसेना (उद्धव ठाकरे गट), मनसे, राष्ट्रवादी कॉंग््रेास (शरद पवार), कॉंग््रेास यांनी देखील बैठका घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थितीत लढण्याची आमची तयारी आहे, असे सर्व प्रमुख पक्षांच्या शहराध्यक्षांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.
निवडणूक आयोगाने प्रदीर्घ कालावधीनंतर महापालिकेची निवडणूक जाहीर केल्याने संविधानाला न्याय मिळाला आहे. निवडणूक जाहीर झाल्याने थांबलेल्या विकासाला चालना मिळणार आहे. यानिमित्त भाजपचा भष्टाचारी कारभार रोखण्याचे काम केले जाईल. निवडणुकीसाठी कॉंग््रेास पक्षाने तयारी केली असून, प्रभागनिहाय बैठका, समन्वय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे, आमच्याकडे सक्षम उमेदवार असून, लवकरच इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. महाविकास आघाडीचीही बैठक झाली असून, सर्वांची एक मूठ बांधून भाजपचा पराभव करायचा निश्चय आम्ही केला आहे.अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, कॉंग््रेास
साडेतीन ते चार वर्षांहून अधिक काळ प्रशासकराजखाली असलेल्या पुणे महापालिकेला अखेर निर्वाचित सभागृह मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले आहे. भाजपने निवडणुकांची जय्यत तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत भाजप व शिवसेना एकत्र, तर भाजप व राष्ट्रवादी कॉंग््रेास आमने-सामने लढणार असल्याचे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यासंदर्भात पक्षाची तयारी काय? याबाबत सांगताना शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले की, महायुतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले असले, तरी अद्याप याबाबत शिवसेनेकडून अधिकृत कोणताही प्रस्ताव मिळालेला नाही. जागावाटपासंदर्भात त्यांचे पक्षप्रमुख किंवा वरिष्ठ नेते आमच्या नेत्यांशी बैठक घेऊन ठरवतील. सध्यातरी आम्ही सर्व जागांवर लढण्याची तयारी सरू केली आहे. इच्छुकांच्या आम्ही मुलाखती घेतल्या असून, त्यांची नावे प्रदेश कमिटीकडे पाठवली आहेत. त्यांच्या प्रभागात सर्व्हे घेऊन कुणाला उमेदवारी द्यायची, हे पक्ष ठरवेल. पुण्यात केंद्र आणि महापालिकेच्या माध्यमातून आम्ही केलेली विकासकामे व भविष्यातील विकासकामांचा अजेंडा ठरवून आम्ही निवडणूक रिंगणात उतरणार आहोत. राष्ट्रवादी कॉंग््रेास शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, महापालिका निवडणुका लढण्याची आम्ही तयारी केली आहे.
तीन ते साडेतीन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. पुण्यात महायुती होणार नाही, हे आधीच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आम्ही महापालिकेच्या सर्व 41 प्रभागांतील 165 जागा लढविण्याची तयारी केली आहे. आम्ही मतदार याद्यांवर पुराव्यांसह आक्षेप नोंदविले आहेत. आयोग योग्य ती दुरुस्ती करेल, अशी अपेक्षा आहे. सध्यातरी आम्ही स्वबळावरच लढण्याची तयारी करीत आहोत, काही घडामोडी झाल्या तर त्या सर्वांसमोर येतीलच.सुनील टिंगरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग््रेास (अजित पवार)
निवडणूक जाहीर झाल्यावर आता पक्षाचा जाहीरनामा करणे, उमेदवारांचे अर्ज मागविणे, मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करणे, या सर्व पातळीवर आमची तयारी सुरू आहे. तर, महाविकास आघाडी म्हणून देखील आम्ही तयारी केली आहे. महाविकास आघाडी म्हणून लढत असताना भाजपला आम्ही नक्कीच धोबीपछाड करू. जागावाटपाबाबत अद्यापतरी ठरले नाही. मात्र, यासंदर्भात आम्ही पुन्हा बैठका घेऊ आणि एकत्रित चर्चा करून यावर निर्णय घेऊ. या निवडणुकीत प्रामुख्याने पुण्यातील वाहतूक कोंडी हा मुद्दा राहणार आहे. गुन्हेगारीत पुण्याचा क्रमांक पहिला लागतो. याबाबत स्वत: गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती पुढे आली आहे. पुण्याला पुरेसे पाणी मिळत नाही. सर्व भागांना समान पाणी पुरविणे, पुण्याचा विद्येचे माहेर घर हा लौकिक पुन्हा मिळवून देणे, महापालिकेला भाजपच्या हजारो कोटींच्या भष्टाचारांपासून मुक्त करणे, हे प्रमुख मुद्दे घेऊन आम्ही निवडणूक रिंगणात उतरणार आहोत.
प्रभागनिहाय उमेदवारांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. 18 आणि 19 डिसेंबरला मुलाखती आहेत. 500 पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील 250 अर्ज जमा झाले आहेत. युती झाली तर वरिष्ठांचे निर्णय आम्हाला मान्य असतील. अजून तरी याबाबत कोणताही निर्णय अथवा चर्चा झाली नाही. सन्मानपूर्वक जागा मिळाव्यात, अशी आमची इच्छा आहे. किमान 40 ते 50 जागा मिळव्यात, अशी आमची इच्छा आहे. पार्किंग, पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी यांसारख्या मुद्द्यांवर आम्ही निवडणूक लढवताना निवडणूक रिंगणात उतरणार आहोत.नाना भानगिरे, शहराध्यक्ष, शिवसेना शिंदे गट
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढण्याचा निर्धार केला असून, अद्याप जागावाटपाबाबत चर्चा झालेली नाही. महाविकास आघाडी झाल्यावर ज्या जागेवर ज्यांचा उमेदवार दिला जाईल, तेथून दुसरा उमेदवार दिला जाणार नाही. तसेच बंडखोरी होणार नाही, याबाबत एकसूर निघाला. येथून पुढे जागावाटपाबाबत बैठका सुरू होणार आहेत. यात यापूर्वी कोणत्या जागेवरून कोण निवडून आले? दुसऱ्या क्रमांकावर कोण होते? आणि इतर जागा लढण्याबाबत निकष काय राहतील? याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. भाजप वगळता इतर सर्व पक्षांना एकत्र आणण्याचा विचार केला जाईल. भाजपला रोखायचे असेल तर समान विचारांचे पक्ष एकत्र येतील. त्या सर्वांना सोबत घेऊन काम करण्यात येईल. मात्र, त्याचे सूत्र कसे ठरवायचे, याचा निर्णय या बैठकीत घेऊन वरिष्ठांशी चर्चा करून अंतिम केला जाईल. भाजपचा भष्टाचार, वाहतूक कोंडी, पाणी समस्या यांसारखे मुद्दे आम्ही घेऊन ही निवडणूक लढणार आहोत.
महाविकास आघाडीसंदर्भात निर्णय झाला असला, तरी पक्षप्रमुख राज ठाकरे जे निर्णय घेतील तो अंतिम राहील. जागावाटपासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. याबाबत बैठका घेऊन चर्चा केली जाणार आहे. तसेच, कोणत्या प्रभागात कुणाला उमेदवारी द्यावी, याबाबत चाचपणी सुरू आहे. सध्या 535 अर्ज आले आहेत. त्यातून निवडून येण्याच्या क्षमतेचा विचार करून योग्य पद्धतीने उमेदवारी दिली जाईल. निवडणूक लढताना पुण्याचे प्रश्न आम्ही प्राधान्याने मांडणार आहोत. यात वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न, गुन्हेगारी यांसारखे मुद्दे मांडणार आहोत.साईनाथ बाबर, शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना