

पुणे : बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षांचा निमीष नावाचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. या चिमुकल्याने दोन आठवडे मृत्यूशी झुंज दिली. अखेर डॉक्टरांनी उपचारांमध्ये प्रयत्नांची शर्थ केल्याने मुलाचे प्राण वाचले.
शेवगाव तालुक्यातील संगमनेरजवळील गावात निमीष इतर मुलांसोबत घराबाहेर खेळत असताना अचानक बिबट्या आला. त्याला पाहून सगळी मुले घाबरून पळाली. परंतु, निमीष तसाच उभा राहिला. बिबट्याने त्याच्यावर झडप घातली आणि त्याच्या मानेचा चावा घेऊन डोके, मांडी आणि कानावर खोल जखमा केल्या. त्याच्या आईने धाडस दाखवत त्याला बिबट्याच्या जबड्यातून सोडविले.
रक्तस्रावाने थरथरत आणि बेशुद्धावस्थेत असलेल्या निमीषवर प्रथम प्रवरा मेडिकल हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले. गंभीर जखमा पाहता त्याला सूर्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. येथे पेडियाट्रिक आयसीयू, प्लास्टिक सर्जरी, नेत्ररोग आणि ईएनटी विभागातील सात डॉक्टरांच्या टीमने त्याच्यावर उपचार सुरू केले. प्लास्टिक सर्जनने फाटलेला स्कल्प, चेहरा आणि कानांचे भाग पुन्हा आकारले. डॉक्टरांनी कानातील छिद्र आणि डोळ्यांतील अंतर्गत रक्तस्राव हाताळला. निमीष सात दिवस लाइफ सपोर्टवर होता.
बिबट्याने त्याच्या डोक्याची, चेहर्याची आणि कानांची नाजूक त्वचा फाडून खोल जखमा केल्या होत्या. त्या धक्क्याने तो कोमात गेला होता. संसर्ग झपाट्याने पसरत होता आणि अवयव काम करणे बंद करीत होते. रक्ताभिसरण आणि मज्जासंस्था कोलमडली होती. किडनीसुद्धा निकामी होऊ लागली होती. मात्र, डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करीत त्याला वाचविले, असे संचालक डॉ. सचिन शाह यांनी सांगितले.