पुणे : राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील 14 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायत निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी मंगळवारपासून (दि. 4) आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीतून नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे अध्यक्ष थेट निवडणुकीच्या माध्यमातून निवडले जाणार आहेत. (Latest Pune News)
नगरपरिषदांसाठी दोन आणि तीन सदस्य अशा पद्धतीने, तर तीन नगरपंचायतींसाठी एक सदस्य प्रभागरचना असणार आहे. बारामती, लोणावळा, चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर या पाच ठिकाणी प्रत्येकी एका प्रभागात तीन सदस्य पद्धतीने निवडणुका होतील. तर उर्वरित नऊ ठिकाणी दोन सदस्य प्रभाग या पद्धतीने निवडणुका होणार आहेत.
जिल्ह्यातील 14 नगरपरिषदांमधील प्रभागांची संख्या 347 असून, तीन नगरपंचायतींची प्रभाग संख्या 51 आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या या निवडणुकीसाठी एक जुलै 2025 या अर्हता दिनांकावरील मतदार यादी ग््रााह्य धरली जाणार आहे. त्यानुसार 14 नगरपरिषदांसाठी 5 लाख 79 हजार 199 मतदार असणार आहेत. तर तीन नगरपंचायतींसाठी 55 हजार 741 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
जिल्ह्यातील 14 नगरपरिषदांसाठी एकूण 660 तर नगरपंचायतींसाठी 70 असे एकूण 730 मतदान केंद्र असणार आहेत. प्रत्येक केंद्रावर 900 ते 1000 मतदारांसाठी एक केंद्र असणार आहे. नगरपंचायतीसाठी मात्र 1000 ते 1100 मतदारांमागे एक केंद्र असणार आहे. या निवडणुकीसाठी 31 ऑक्टोबर रोजी मतदार यादी अंतिम झाली असली तरी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी सात नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या 14 नगरपरिषदांपैकी बारामती ही अ वर्ग, तर लोणावळा, दौंड, चाकण, तळेगाव दाभाडे व फुरसुंगी उरळी देवाची या पाच नगरपरिषदा ब वर्गामध्ये आहेत. उर्वरित नगरपरिषदा क वर्गात मोडतात.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण सहा उपजिल्हाधिकारी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. तर क वर्ग नगरपरिषदांसाठी आणि नगरपंचायतीसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे 11 तहसीलदार यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. प्रत्येक नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी मुख्याधिकारी यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.
नव्याने अस्तित्वात आलेल्या फुरसुंगी- उरळी देवाची नगरपरिषद आणि मंचर आणि माळेगाव या नगरपंचायतीसाठी पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. फुरसुंगी - उरळी देवाची नगरपालिकेसाठी द्विसदस्य पद्धतीने निवडणूक होणार आहे. एकूण प्रभाग संख्या 16, तर नगरसेवकांची संख्या 32 असणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसारही याच संहिता केवळ नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रासाठी लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी या क्षेत्रात सुमारे सहा लाख 34 मतदार असून त्यातील 17 हजार 744 मतदार दुबार आणि तिबार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल.जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी
पुणे : राज्य निवडणूक आयागाने राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या तारखा आज जाहीर केल्या असून, जिल्ह्यातील 14 नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकांपैकी खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या 8 ठिकाणी सर्वाधिक चुरस पाहायला मिळणार आहे.
बारामतीसह राजगुरुनगर, जेजुरी, आळंदी, तळेगाव-दाभाडे, सासवड, भोर आणि इंदापूर या नगरपरिषदांचे नगराध्यक्षपद सर्वांसाठी खुले असल्याने येथील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. त्यातही बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले चिरंजीव जय पवार यांना रिंगणात उतरविल्याने सर्व राज्याचे लक्ष या नगराध्यपदाकडे लागले आहे. त्यांच्याविरोधात पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांतील सदस्य उभे राहणार का? याची चर्चा राजकीय वर्तळात सुरू झाली आहे. राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तळेगाव-दाभाडे, इंदापूर, भोर, सासवड या नगरपरिषदांवर कोण सत्तेवर येणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
एकीकडे नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका घोषित झाल्या असल्या, तरीही महाविकास आघाडी आणि महायुती पक्ष एकत्र लढणार की स्वबळावर लढवणार, याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नसल्याने सर्व उमेदवारांनी आपापल्या परीने शक्ती पणाला लावली आहे.