

पिंपरखेड : पिंपरखेड (ता. शिरूर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या 13 वर्षीय रोहन विलास बोंबे याच्यावर मृत्यूनंतर 42 तासांनी मंगळवारी (दि. 4 ) सकाळी दहा वाजता शोकाकुल वातावरणात येथील दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.(Latest Pune News)
रविवारी (दि. 2) दुपारी पावणे चारच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात रोहनचा मृत्यू झाल्याने पिंपरखेड परिसरात नागरिकांचा उद्रेक झाला. नागरिकांनी वन विभागाचे वाहन, बेस कॅम्प पेटवून दिला. संतप्त नागरिकांनी पंचतळे तसेच रोडेवाडी फाटा येथे बेल्हे-जेजुरी राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह ताब्यात न घेता शासनाकडून ठोस निर्णय झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करण्यास नकार देत पुणे-नाशिक महामागार्वर आंदोलन करण्यात आले.
अखेर रोहनच्या मृत्यूच्या घटनेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे तब्बल 42 तासांनी मंगळवारी सकाळी दहा वाजता येथील महानुभाव दफनभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी रोहनचे आई-वडील, भाऊ आजीसह नातेवाईकांच्या अश्रुंचा बांध फुटल्याने उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. या वेळी पोलिस उपअधीक्षक प्रशांत ढोले, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के आदींसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
पिंपरखेड येथे लागोपाठ दोन चिमुकल्यांच्या मृत्यूच्या घटनेने लहान मुलांसह नागरिक प्रचंड भीतीच्या छायेत आहेत. या घटनेचा निषेध म्हणून सलग दुसऱ्या दिवशी गावात बंद पाळण्यात आला. या संवेदनशील घटनेमुळे पिंपरखेडमधील स्थानिक शालेय व्यवस्थापनाकडून जिल्हा परिषद शाळा तसेच विद्यालयाच्या मुलांना मंगळवारी सुटी देण्यात आली होती.