कोथरूड मतदारसंघ
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील पुणे महापालिकेच्या प्रभागांची नवी प्रभागरचना पाहता भाजपच्या विद्यमान उमेदवारांची विशेष काळजी घेणारी असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोथरूडमध्ये 2017 च्या निवडणुकीत 24 पैकी 18 नगरसेवक भाजपचे निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीतदेखील या मतदारसंघातून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यावर भाजपचा भर आहे. त्यामुळे महायुतीचा महत्त्वाचा घटक असलेल्या राष्ट्रवादीचे
बडे नेते दीपक मानकर यांचे प्राबल्य असलेल्या प्रभागांचीही चांगलीच तोडफोड केली आहे. त्यामुळे त्यांना मात्र धक्का बसला आहे. (Latest Pune News)
कोथरूड मतदारसंघ हा भाजपचा गड आहे. यंदाच्या निवडणुकीत कोथरूडमध्ये 4 सदस्यीय प्रभाग राहणार आहेत. नुकत्याच झालेल्या प्रारूप प्रभागरचनेमध्ये मतदार संघातील काही प्रभाग ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत, तर काही प्रभागात किरकोळ बदल केला आहे. काही प्रभागांचा क्रमांक बदलला असून, काही प्रभागांचा काही भाग दुसर्या प्रभागाला जोडून भाजपचे जास्तीत जास्त नगरसेवक या बालेकिल्ल्यातून निवडून येतील अशी व्यवस्था केली असल्याचे स्पष्ट होत आहे.
कोथरूड विधानसभा मतदारसंघात रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर (प्रभाग 11), सुस-पाषाण-बाणेर ( प्रभाग 9), डेक्कन जिमखाना- हॅप्पी कॉलोनी (प्रभाग 29), मयूर कॉलनी-कोथरूड (प्रभाग 31), कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी (प्रभाग 30) यांचा प्रामुख्याने समावेश होतो. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेनुसार, डेक्कन जिमखाना - हॅप्पी कॉलनी (प्रभाग 29) हा पूर्वी प्रभाग 13 होता.
याला शिवाजीनगरचा डेक्कन परिसराचा काही भाग जोडण्यात आला आहे. प्रभाग 11 मधील ‘मेगासिटी’ हा भाग आता डेक्कन जिमखाना - हॅप्पी कॉलनीला जोडण्यात आला आहे, तर मयूर कॉलनी-कोथरूड प्रभागातील शिला विहार कॉलनी आणि भीमनगर हे दोन भागदेखील डेक्कन जिमखाना - हॅप्पी कॉलनीला जोडण्यात आले आहेत.
बावधन भुसारी कॉलनी (प्रभाग 10)मधील परमहंसनगर, बावधन बुद्रुक हा भाग ‘मयूर कॉलनी-कोथरूड प्रभागाला जोडला आहे. साहजिकच विद्यमान श्रद्धा प्रभुणे-पाठक यांचा निवासी भाग वगळला असून, त्यांना धक्का बसला आहे, तर किरण दगडे-पाटील यांना अनुकूल भाग समाविष्ट झाला आहे.
मात्र, पूर्वीपासून भाजपला अनुकूल असलेल्या प्रभागालाच परमहंसनगर जोडल्याने हा प्रभाग भाजपसाठी आणखी सेफ करण्यात आला आहे. कर्वेनगर-हिंगणे कॉलनी (प्रभाग 30) भागातील महामार्गालगतचा काही भागदेखील आताच्या मयूर कॉलनी -कोथरूड प्रभाग 31 ला जोडण्यात आला आहे.
प्रभाग 11 मध्ये महायुतीतील राष्ट्रवादीचे प्रमुख उमेदवार दीपक मानकर यांना अनुकूल असलेला काही भाग हा दुसर्या प्रभागात जोडला असल्याने त्यांना मोठा धक्का बसणार आहे. या निवडणुकीत मानकर त्यांचे चिरंजीव हर्षवर्धन मानकर यांना उभे करण्याच्या तयारीत होते. मात्र, या तोडफोडीमुळे त्यांच्या मतांवर परिणाम होणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. चंदू कदम यांना प्रभागाच्या बदलाचा फारसा धोका नाही, असे दिसते.
विद्यमानांसह नव्या इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग
कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजप गेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनाच संधी देण्याची शक्यता आहे. भाजपने कोथरूडमध्ये अनेक कार्यकर्ते तयार केले आहे. त्यामुळे तेदेखील तिकीट मिळवण्यास इच्छुक आहेत. इतकी वर्षे वाट पाहिल्यावर त्यांना संधी मिळाली नाही तर ते दुसर्या वाटा शोधतील, अशीदेखील शक्यता आहे.
शिवाजीनगर मतदारसंघ
2014 पासून झालेल्या महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये शिवाजीनगर मतदारसंघ भाजपसाठी अनुकूल ठरला आहे. मागील निवडणुकांमध्ये एकहाती विजय मिळाल्यामुळे यंदा प्रभागरचनेत मोठा बदल टाळण्यात आला आहे.
केवळ 10 ते 15 टक्के इतकाच किरकोळ फेरबदल करण्यात आला आहे. दरम्यान, कामगार पुतळा व राजीव गांधी झोपडपट्ट्या मेट्रो प्रकल्पामुळे दुसर्या मतदारसंघात स्थलांतरित झाल्या आहेत. त्यामुळे या बदलाचा राजकीय फायदा भाजपला होईल, असे विश्लेषण तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
2017 च्या महापालिका निवडणुकीत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील तीन प्रभागांमध्ये भाजपने निर्विवाद यश मिळवले होते. 12 पैकी 10 नगरसेवक भाजपचे होते, तर उर्वरित 2 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे होते. मात्र, त्यांनीदेखील भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढवली होती.
त्या वेळी प्रभाग क्र. 7 (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठड्ढवाकडेवाडी), प्रभाग क्र. 8 (औंधड्ढबोपोडी) आणि प्रभाग क्र. 14 (डेक्कन जिमखानाड्ढमॉडेल कॉलनी) हे या मतदारसंघात येत होते. यंदा झालेल्या नव्या रचनेनुसार प्रभाग क्र. 7 आणि 8 कायम आहेत, मात्र प्रभाग क्र. 14 चा क्रमांक बदलून आता तो प्रभाग क्र. 12 करण्यात आला आहे.
प्रभाग क्र. 7 वाकडेवाडी- गोखलेनगर
प्रभाग क्र. 7 वाकडेवाडीड्ढगोखलेनगर हद्द 10 ते 15 टक्क्यांनी वाढविण्यात आली आहे. पंचवटीपासून सुरू होणारा हा प्रभाग येरवड्यापर्यंत वाढविण्यात आला असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा भाग वगळण्यात आला आहे. संगमवाडी गावठाणाचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. हा प्रभाग मिश्र वस्तीचा असून येथे सोसायट्या आणि झोपडपट्टी दोन्ही प्रकारचा परिसर आहे.
मागील वेळी सोनाली लांडगे, राजश्री काळे, आदित्य मावळे आणि भाजप समर्थित रेश्मा भोसले निवडून आल्या होत्या.यंदा इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे नवीन उमेदवारांना संधी मिळेल का, याकडे लक्ष लागले आहे. 2017 मध्ये मतदारसंख्या 84,958 होती. यावेळी ती 89,957 झाली आहे. म्हणजेच क्षेत्रफळ वाढले असले तरी मतदारसंख्येत केवळ 5 हजारांची वाढ झाली आहे.
प्रभाग क्र. 8 औंधड्ढबोपोडी या प्रभागातून पंचवटीचा भाग वगळण्यात आला आहे. त्याऐवजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा भाग जोडण्यात आला आहे. मागील वेळी सुनिता वाडेकर, अर्चना मुसळे, विजय शेवाळे आणि प्रकाश ढोरे हे नगरसेवक विजयी झाले होते. नव्या रचनेनुसार सुमारे 5 हजार मतदारांची वाढ झाली आहे.
प्रभाग क्र. 12 छत्रपती शिवाजीनगरड्ढमॉडेल कॉलनी हा प्रभाग नळस्टॉपपासून सुरू होऊन डेक्कन, आपटे रस्ता, शिवाजीनगर न्यायालय, वडारवाडी, शिवाजीनगर पोलिस वसाहत आणि न ता वाडीपर्यंत पसरला आहे. रामोशी वाडीचा काही भाग कमी करून इराणी वस्तीचा समावेश करण्यात आला आहे. मागील वेळी स्वाती लोखंडे, निलीमा खाडे, ज्योत्स्ना एकबोटे आणि सिद्धार्थ शिरोळे हे नगरसेवक विजयी झाले होते. त्यापैकी सिद्धार्थ शिरोळे विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले.
प्रभाग 12 अन् 7 मध्ये रंगणार दिग्गजांची लढाई
प्रभाग 12 आणि प्रभाग 7 मध्ये पुन्हा एकदा दिग्गज उमेदवार पाहायला मिळणार आहेत. नीलेश निकम, अण्णा मुकारी अलगुडे, बाळासाहेब बोडके आदी दिग्गज पुन्हा निवडणुकीच्या शर्यतीत दिसणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नवीन इच्छुकांचीही गर्दी पाहायला मिळेल. मात्र, महाविकास आघाडी आणि महायुती वेगवेगळ्या लढल्या, तरच कार्यकर्त्यांना संधी मिळू शकेल, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हडपसर विधानसभा मतदारसंघातील प्रभागांची राजकीय परिस्थिती सध्या गुंतागुंतीची आणि बदलती आहे. या मतदारसंघामध्ये पूर्वी आठ प्रभाग होते. नवीन रचनेनुसार आठच प्रभाग राहिले असले, तरी अनेक भागांच्या मोडतोडीने अनेकांची अस्वस्थता वाढली आहे. त्याचबरोबर राजकीय द़ृष्ट्या महायुतीचा एक आमदार विधानसभेवर, तर दुसरा विधानपरिषदेवर असल्याने महायुतीचे प्राबल्य दिसून येत आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ 2009 मध्ये पहिल्यांदा राखीव झाला आणि पहिल्यांदा काँग्रेसचा आणि त्यानंतर आतापर्यंत भाजपचा आमदार या मतदारसंघातून निवडून आला आहे. 2 लाख 90 हजार मतदार संख्या असलेला हा विधानसभा मतदारसंघ शहरातील सर्वांत कमी मतदार असलेला मतदारसंघ आहे.
2017 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी या मतदारसंघात एकूण पाच प्रभाग होते. त्यामध्ये रास्ता पेठ- रविवारपेठ (प्रभाग-17), खडकमाळ आळी- महात्मा फुले पेठ (प्रभाग-18), लोहियानगर -कासेवाडी (प्रभाग-19), ताडीवाला रोड- ससून हॉस्पिट्ल (प्रभाग-20), कोरेगाव पार्क-घोरपडी (प्रभाग-21) यांचा समावेश आहे.
या पाच प्रभागांमध्ये एकूण 20 नगरसेवक आहेत. त्यात महाविकास आघाडीचे 8 आणि भाजपाचे 12 आहेत. आगामी होणार्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी कासेवाडी- डायस प्लॉट (प्रभाग-22), रविवार पेठ-नाना पेठ (प्रभाग-23), कमला नेहरू हॉस्पिटल- रास्ता पेठ (प्रभाग-24), पुणे स्टेशन- जय जवाननगर (प्रभाग-13), कोरेगाव पार्क-मुंढवा (प्रभाग क्र. 17) आणि वानवडी-साळुंके विहार (प्रभाग क्र. 18) अशा सहा प्रभागांचा समावेश करण्यात आलेला आहे.
आगामी निवडणुका लक्षात घेऊन यावेळी केलेल्या प्रभागांची रचनांमध्ये मोठ्या प्रमाणावर मोडतोड करण्यात आलेली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांना चांगलेच झुजांवे लागणार असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. नवीन रचनेनुसार शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सोमवार आणि मंगळवार पेठेचा अर्धा भाग कसबा तर उर्वरित भाग पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील प्रभागांना जोडण्यात आलेला आहे. कासेवाडी हा प्रभाग डायस प्लॉट पर्यत जोडण्यात आलेला आहे.
ताडीवाला रोड- ससून हॉस्पिटल प्रभागाची मोठी मोडतोड करण्यात आली असून, या प्रभागात येरवडा मधील जयजवान नगरचा भाग जोडण्यात आला आहे. कोरेगाव पार्क -घोरपडी या प्रभागातील बहुतांश भाग हा हडपसर विधानसभा मतदारसंघास जोडण्यात आला आहे. अत्यंत विचित्र पद्धतीने या विधानसभा मतदारसंघातील प्रभागांची मोडतोड केलेली असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भाजपास त्यांना हवे असल्यानुसार प्रभागांची रचना केली असल्याचे दिसून आले आहे.
अशी आहे प्रभागरचना !
1) कासेवाडी- डायस प्लॉट (प्रभाग-22-पूर्ण),
2) रविवार पेठ- नाना पेठ (प्रभाग- -23-काही भाग)
3) पुणे स्टेशन- जय जवाननगर (येरवडा- प्रभाग-13-काही भाग)
4) कमला नेहरू हॉस्पिटल- रास्ता पेठ (प्रभाग-24 -काही भाग)
5) कोरेगाव पार्क- मुंढवा (प्रभाग क्र. 17)
6) वानवडी-साळुंके विहार (प्रभाग क्र. 18)
हडपसर मतदारसंघ
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हडपसर विधानसभा मतदारसंघातील प्रभागांची राजकीय परिस्थिती सध्या गुंतागुंतीची आणि बदलती आहे. या मतदारसंघामध्ये पूर्वी आठ प्रभाग होते. नवीन रचनेनुसार आठच प्रभाग राहिले असले, तरी अनेक भागांच्या मोडतोडीने अनेकांची अस्वस्थता वाढली आहे. त्याचबरोबर राजकीय द़ृष्ट्या महायुतीचा एक आमदार विधानसभेवर, तर दुसरा विधानपरिषदेवर असल्याने महायुतीचे प्राबल्य दिसून येत आहे.
पुणे पालिकेच्या 2017 च्या निवडणुकीमध्ये 41 प्रभाग होते. त्यामधून 162 नगरसेवक निवडून आले होते. नवीन प्रभागरचनेनुसार प्रभाग 41 च राहिलेले असून, नगरसेवकांची वाढ झाली आहे. 162 ऐवजी आता 165 नगरसेवक असणार आहेत.
हडपसर विधानसभा मतदारसंघाचा विचार करताना या प्रभागरचनेत झालेले बदल, विशेषतः प्रभागांची पुनर्रचना आणि सीमांकनामुळे अनेक विद्यमान नगरसेवकांचे राजकीय गणित बदलले आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये नवीन प्रभागांवर लक्ष केंद्रित करण्याची चढाओढ सुरू झाली आहे आणि जुन्या प्रभागांतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.
राजकीयद़ृष्ट्या हडपसर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, अलीकडील राजकीय घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असून, सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), भाजप आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपावरून आणि उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे.
त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांची महायुती असून, तेथे तिकिटासाठी मारामारी असणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये असलेल्या घटकपक्षांतही अनेक ठिकाणी उमेदवारीसाठी स्पर्धा आहे.
नवीन प्रभागरचनेनुसार 14 क्रमांक मुंढवा-कोरेगाव पार्क, 15 क्रमांक मांजरी बु.-साडेसतरा नळी, 16 क्रमांक हडपसर-सातववाडी, 17 क्रमांक रामटेकडी-माळवाडी, 18 क्रमांक साळुंके विहार-वानवडी, 19 क्रमांक कोंढवा खु.-कौसरबाग, 40 क्रमांक कोंढवा बु.-येवलेवाडी, 41 क्रमांक महंमदवाडी-उंड्री असे आठ प्रभाग नव्याने असले; तरी या सर्वच प्रभागांची मोडतोड झालेली पाहायला मिळत आहे.
हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत केशवनगर, मांजरी बु, आणि साडेसतरा नळी हे तीन गावे समाविष्ट झाली असून, त्यामुळे सर्वच प्रभागांची सरमिसळ केली आहे. या सर्वांचा फायदा राजकीय द़ृष्ट्या महायुतीला होणार असला तरी महायुतीमध्येही भाजपला अधिक फायदेशीर प्रभाग ठरणार आहेत.
वडगाव शेरी मतदारसंघ
पुण्याच्या पूर्व भागात असलेल्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाची नव्या प्रभागरचनेत मोठ्या प्रमाणात झालेली मोडतोड, हा प्रभागात चर्चेचा विषय ठरत आहे. नव्या प्रभागरचनांमध्ये गावांतील लहान भागांसह येरवडा गावाचे तीन, तर लोहगाव व वाघोली गावांची दोन भागांत विभागणी करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला चितपट करण्यात बलस्थान ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांना नव्या प्रभागरचनेतून सुरुंग लावण्यात आला आहे. नव्या प्रभागरचनेमुळे मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी माजी नगरसेवकांसह इच्छुकांची चांगलीच दमछाक होणार असल्याचे चित्र येथील सर्व प्रभागांत आहे.
कळस-धानोरी प्रभागाची रचना पूर्वीसारखी ठेवण्यात आली आहे. या भागातून काही भाग वगळण्यात आले नसले, तरी लोहगावचा काही भाग जोडण्यात आला आहे. फुलेनगर-नागपूर चाळ प्रभागाची रचनाही जवळपास पूर्वीसारखीच आहे. मात्र, माजी आमदारांच्या बंधूंच्या हक्काचा बर्माशेल, कलवड, खेसे पार्क भाग तोडण्यात आला आहे.
लोहगाव-विमाननगर प्रभागात पूर्वी वडगाव शेरीचा भाग असलेला सोमनाथनगर व गणेशनगरचा भाग जोडण्यात आला आहे. मागील विधानसभा निवडणुकांत या भागातून महाविकास आघाडीला चांगली मते पडली होती, तर खराडी-वाघोली हा प्रभाग विद्यमान आमदारांना अनुकूल असा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाघोलीतील सर्वपक्षीय इच्छुकांची कोंडी होण्याची शक्यता अधिक आहे.
कल्याणीनगर-वडगाव शेरी प्रभाग हा जुन्या रचनेप्रमाणे कायम आहे. त्यामध्ये गांधीनगरसमोरील पट्टा तसेच कल्याणीनगरचा काही भाग जोडण्यात आला आहे. परराज्यातील नागरिकांची मते आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे. मागील निवडणुकांत जुनी लोहगाव हद्द तसेच विमानगर असा प्रभाग होता.
या वेळी लोहगाव व वाघोलीचे दोन तुकडे करण्यात आले आहेत. मुळात लोहगाव व विमानगर हे महसुली विभाग एकत्र येण्याची आवश्यकता असून, येथील मतदारांची संख्याही एक लाखाच्या वर असल्याने त्याबाबत हरकती व सूचना देण्याची तयारी येथील इच्छुकांनी केली आहे. कळस-धानोरी प्रभागातील विश्रांतवाडीमधील काही भाग फुलेनगर-नागपूर चाळला जोडण्यात आला आहे. येरवडा गावठाणाचे तीन तुकड्यांत विभाजन करण्यात आले आहे.
पूर्वीच्या येरवडा प्रभागात गांधीनगर समाविष्ट करण्यात आले आहे. उर्वरित भाग बंडगार्डन, संगमवाडीला जोडण्यात आल्याने त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाला बसणार. हे निश्चित मानले जात आहे.