

पुणे: महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना करताना नियम धाब्यावर बसवून प्रभागांची हद्द निश्चित करण्यात आली आहे. नदी, नाले आणि मुख्य रस्त्यांच्या हद्दीही महापालिका प्रशासनाकडून तोडण्यात आल्या आहेत. या चित्र-विचित्र रचनेने इच्छुकही हवालदिल झाल्याचे चित्र आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठीची पुणे महापालिकेची चार सदस्यीय प्रारूप प्रभागरचना शुक्रवारी जाहीर झाली. या नव्या रचनेत 41 प्रभाग झाले असून, त्यात 40 प्रभाग चार सदस्यीय तर एक प्रभाग पाच सदस्यीय आहे. राज्य शासनाने दिलेल्या सूचनांनुसार पालिका प्रशासनाकडून ही प्रारूपरचना करण्यात आली आहे. (Latest Pune News)
ही रचना करताना प्रामुख्याने प्रभागांच्या सीमा रेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, रेल्वे रुळ, उड्डाणपूल इत्यादी नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊन प्रभागांच्या हद्दी निश्चित कराव्यात. तसेच प्रभाग रचनेच्या बाबतीत कोणासही शंका घेण्यास वाव राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावे, असे स्पष्टपणे बजावले होते. मात्र, महापालिका प्रशासनाने केलेल्या रचनेत दिलेल्या सूचनांना अक्षरश: केराची टोपली दाखवून रचना करण्यात आली आहे.
प्रामुख्याने तीन प्रभागांची रचना करताना थेट नद्दीची हद्द ओलांडून प्रभाग करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रभाग क्र. 13, पुणे स्टेशन-जय जवाननगर या प्रभागाची रचना करताना मुळा-मुठा नदीची हद्द ओलांडण्यात आले आहे.
याशिवाय या प्रभागातच पुणे रेल्वे स्टेशन असून, त्याची हद्द तोडून या प्रभागाची विचित्र कशा रचना करण्यात आली आहे, कसबा पेठ, पुणे कॅन्टोमेन्ट आणि शिवाजीनगर अशा तीन विधानसभा मतदारसंघांत हा प्रभाग विभागाला गेला आहे. याच पद्धतीने प्रभाग क्र. 15, मांजरी बुद्रुक-साडेसतरा नळी या प्रभागाची रचना करतानाही नदीची हद्द ओलांडून करण्यात आली आहे.
या प्रभागात खराडीच्या भागाची लचकेतोड करून पुढे सोलापूर हायवेची हद्द तोडून प्रभाग करण्यात आला आहे. प्रभाग क्र. 5, विमाननगर-लोहगाव हा जवळपास दहा ते पंधरा किमीची हद्द असलेल्या प्रभागात विमानतळ, नगर हायवे यांच्या हद्दींना केराची टोपली दाखविण्यात आली आहे. या प्रभागात एका ठिकाणी नगर रस्त्यांची हद्द ओलांडून सोमनाथनगरचा भाग घेण्यात आला आहे. तर पुढे या प्रभागाशी संलग्न असलेल्या खुळेवाडीला तोडून तो नगर रस्त्याची हद्द तोडून प्रभाग क्र 4 ला जोडण्यात आला आहे.
शहरातील सगळ्यात मोठा पाच सदस्यीय प्रभाग क्र. 38, आंबेगाव-कात्रजची रचना करतानाही जुना कात्रज रस्ता आणि नव्याने आंबेगाव मार्गे कोल्हापूरच्या दिशेने जाणारा रस्ता यांच्या हद्दीसह या भागातील टेकड्यांच्या हद्द ओलांडण्यात आली आहे. भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा प्रभाग ठरलेल्या प्रभाग क्र. 33, शिवणे-खडकवासला या प्रभागातही खडकवासला धरण आणि त्यातून पुढे वाहत येणार्या मुठा नदीच्या दोन्ही बाजूंचा प्रभाग जोडण्यात आला आहे.
त्यामुळे येथील उमेदवारांची अक्षरश: दमछाक होणार आहे. याशिवाय अन्य प्रभागांच्या रचनेत शहरातून जाणारे मुख्य हायवे, मुख्य नाले यांच्या नैसर्गिक हद्दीचा विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रशासनाने केलेली रचना पूर्णपणे राजकीय अनुकूलतेने केली असल्यावर शिक्कामोर्तब होत आहे.