पुणे: महापालिकेने 2025-26 या आर्थिक वर्षात उत्पन्नाच्या बाबतीत नवा विक्रम प्रस्थापित करत 9 हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे एक हजार कोटी रुपयांची वाढ नोंदवली जाणार असून, महापालिकेच्या इतिहासातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक उत्पन्न ठरणार आहे. प्रशासनासाठी ही महत्त्वाची कामगिरी असली तरी आता नव्या सत्ताधाऱ्यांसमोर हे उत्पन्न टिकवून ठेवण्याचे आणि वाढवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
महापालिका आयुक्तांनी 2025-26 वर्षासाठी 12 हजार 618 कोटींचे अंदाजपत्रक मांडले होते. त्यापैकी 30 मार्चअखेर सुमारे 9 हजार कोटींचे उत्पन्न जमा झाले आहे. 31 मार्च रोजी सुटी असली तरी ऑनलाईन भरणा सुरू राहणार असल्याने अंतिम आकडा 9 हजार 200 कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
उत्पन्नाच्या प्रमुख स्रोतांमध्ये मिळकतकर आणि जीएसटीचा प्रत्येकी सुमारे 3 हजार कोटींचा वाटा आहे. बांधकाम परवानग्यांमधून यंदा अपेक्षेपेक्षा कमी, सुमारे 2000 ते 2200 कोटींचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय पाणीपट्टीमधून सुमारे 200 कोटी, मुद्रांक शुल्कातून 100 ते 150 कोटी, तसेच शासकीय अनुदान आणि इतर स्रोतांमधून सुमारे 600 कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. तुलनेत 2024-25 या आर्थिक वर्षात महापालिकेला 8 हजार 272 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.
मोजण्या बंदचा परिणाम उत्पन्नावर
भूमिअभिलेख विभागाकडून वहिवाटीच्या मोजण्या बंद केल्यामुळे बांधकाम प्रकल्पांच्या मंजुरीवर परिणाम झाला आहे. तात्पुरते रेखांकन करण्यास नकार मिळत असल्याने अनेक प्रकल्प प्रलंबित राहिले असून, त्याचा थेट परिणाम बांधकाम विभागाच्या उत्पन्नावर झाला आहे.
सत्ताधाऱ्यांपुढे आर्थिक लक्ष्य पूर्ण करण्याचे आव्हान
प्रशासक काळात महापालिकेने उत्पन्नवाढ साधली असली तरी आता नव्या नेतृत्वासमोर आर्थिक लक्ष्य पूर्ण करण्याचे आव्हान उभे आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी 2025-26 साठी 15 हजार 669 कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे. मात्र, जाहीर योजनांची अंमलबजावणी करताना हे उद्दिष्ट गाठणे सत्ताधाऱ्यांसाठी कठीण ठरण्याची शक्यता आहे.