पुणे: शहरातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांविरोधात पुणे महापालिकेने कारवाईचा वेग वाढवला आहे. शहराच्या विविध भागांत गुरुवारी नवव्या दिवशी राबविण्यात आलेल्या मोहिमेत तब्बल २ लाख २२ हजार ८६० चौरस फूट क्षेत्रावरील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरातील सहा झोनमध्ये ही कारवाईची मोहीम राबवली.
झोन दोनमध्ये कोंढवा खुर्द येथील परगेनगर ते वेलकम हॉल चौक या परिसरात २१ हजार ५० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटवली. परिमंडळ तीनमध्ये बावधन येथे ५ हजार ९१० चौरस फुटांवर कारवाई केली.
परिमंडळ चारमध्ये वन पार्क ते लोहगाव स्मशानभूमी परिसरात ७२ हजार २०० चौरस फूट, तर तसेच विश्रांतवाडी ते विमानतळ रस्त्यावरील १० हजार २०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे जमीनदोस्त केली. परिमंडळ पाचमध्ये पर्वती-सहकारनगर परिसरात ७० हजार चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटवण्यात आली.
तर, परिमंडळ सहामध्ये पाषाण-सूस रस्ता, पाषाण, बालाजी चौक, डॉल्फिन चौक आणि शिवशक्ती चौक परिसरात ४३ हजार ५०० चौरस फुटांवर कारवाई केली. दरम्यान, यापूर्वी व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे काही भागांतील अतिक्रमण कारवाईचा वेग मंदावल्याचे चित्र होते.
मात्र, गुरुवारच्या आकडेवारीवरून महापालिकेने शहराच्या विविध भागांत पुन्हा व्यापक स्तरावर कारवाई सुरू ठेवल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, एकीकडे छोट्या राजकीय कार्यकर्त्यांची अतिक्रमणे जमीनदोस्त होत असताना नगरसेवक आणि मोठ्या राजकीय कार्यकर्त्यांच्या अतिक्रमणांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.