पुणे: पुणे महापालिका प्रशासनाने क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्रचना चुकीच्या पद्धतीने केली आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे, अशी तक्रार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन नगरविकास विभागाने क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेसंबंधींचा अहवाल महापालिकेकडून मागविला आहे.
महापालिका निवडणुकीनंतर 15 क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्रचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे. क्षेत्रीय कार्यालयांच्या नव्या रचनेनुसार 14 क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व निर्माण होणार आहे, तर काँग््रेासला एक प्रभाग समिती मिळणार आहे.
प्रशासनाच्या रचनेत झालेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे दुसऱ्या क्रमाकांचे संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादी काँग््रेासला एकही प्रभाग समिती मिळू शकणार नाही, याबाबत राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने आयुक्तांकडे तक्रारही केली होती. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या दबावामुळे आयुक्तांनी ही रचना दुरुस्त करण्याचे धाडस दाखविले नव्हते.
दरम्यान, आता खुद्द उपमुख्यमंत्री पवार यांनीच याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे क्षेत्रीय कार्यालयांच्या चुकीच्या पुनर्रचनेची तक्रार केली आहे. या तक्रारीत प्रामुख्याने वडगाव शेरी मतदारसंघात येरवडा क्षेत्रीय कार्यालयाशी निगडित असलेल्या प्रभाग क्र. 1 व 2 नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाला जोडण्यात आला, तर प्रभाग क्र. 4, 5 व 6 येरवडा क्षेत्रीय कार्यालयाला जोडण्यात आला आहे. प्रभाग क्र. 6 मध्ये खराडी, वाघोलीचा भाग येतो.
या भागाला येरवडा क्षेत्रीय कार्यालय भौगोलिकदृष्ट्या लांबचे आहे. त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही चुकीची रचना दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान, या तक्रारीनंतर आता नगरविकास विभागाने महापालिकेला पत्र पाठवून क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेचा अहवाल मागविला आहे. त्यामुळे आता चुकीची रचना दुरुस्त होण्याची शक्यता आहे.