

महाळुंगे पडवळ: आंबेगाव तालुक्याच्या उत्तर भागात सध्या कांदा काढणीचा हंगाम सुरू आहे. मात्र, रणरणत्या उन्हामुळे कांदा काढताना शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कडक उन्हात काम करताना शेतकरी व मजूरवर्ग त्रस्त झाला आहे.
जिल्ह्याच्या उत्तर भागात सध्या कडक उन्हाळा आहे. आंबेगावातील तपमान 38 अंशावर पोहचले आहे. सध्या कांदा काढणीसाठी शेतकरी लगबग करताना दिसत आहेत. मात्र, या कामात त्यांना कडक उन्हाचा सामाना करावा लागत आहे. या उन्हामुळे कांदा काढणीत व्यत्यय येत आहे. तालुक्यात यंदा खरीप व उन्हाळी हंगामात सुमारे 6 हजार हेक्टरवर कांद्याची लागवड करण्यात आली. सध्या बहुतांश ठिकाणी कांदा काढणी सुरू आहे. मात्र, मजूरटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत असून, उपलब्ध मजुरांचे दरही वाढले आहेत.
कांद्याला 10 रुपये दर
दरम्यान, बाजारात कांद्याला अत्यंत कमी दर मिळत असून, सध्या सुमारे 10 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी होत आहे. त्यातच युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशात निर्यात होत नाही, तर राज्याबाहेर कांद्याला मागणी नाही. परिणामी, कांद्याचे भाव कमी होत चालले आहेत, असे कांदा अडतदार सागर थोरात आणि किरण निघोट यांनी स्पष्ट केले.
परप्रांतीय मजुरांच्या टोळ्या
मजूरटंचाईमुळे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांतून मजुरांच्या टोळ्या आंबेगाव परिसरात दाखल झाल्या आहेत. कांदा काढणी व कापणीसाठी सुमारे 15 हजार रुपये दर आकारला जातो. ट्रॅक्टर वाहतुकीसाठी प्रतिट्रॉली सुमारे 1 हजार रुपये खर्च येतो तसेच कांदा पिशव्या भरणे व बराकीत साठवण्यासाठी अतिरिक्त 500 रुपये खर्च करावे लागत आहेत.
रणरणत्या उन्हात कांदा काढणीची लगबग
सध्या बेट भागात प्रचंड ऊन वाढले आहे. या कडक उन्हामुळे ग््राामीण भागातही 38 ते 40 अंशांवर पारा गेला आहे. या स्थितीतही बेट भागातील शेतकरी कांदा काढणीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र, सध्या कांद्याला योग्य दर मिळत नसल्याने भर उन्हातील कष्ट वाया जाण्याची चिंता शेतकरीवर्गात आहे. वाढत्या तापमानामुळे शेतात काम करणे दुरापास्त झाले आहे. सकाळी 10 वाजेनंतर माळरानावर उभे राहणेही कठीण होत आहे. परिणामी, कांदा काढणीसाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. जे मजूर कामावर येत आहेत, ते केवळ सकाळच्या सत्रातच काम करतात.
उन्हाळी भुईमूग पिकाला पाण्याचा ताण
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात वाढत्या उष्णतेचा आणि तीव पाणीटंचाईचा फटका आता शेतपिकांना बसू लागला आहे. विशेषतः उन्हाळी भुईमूग पिकावर याचा मोठा परिणाम दिसून येत असून, अनेक ठिकाणी पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. पारगाव, शिंगवे, नागापूर, रांजणी, वळती, थोरांदळे, खडकी, लौकी आदी परिसरात शेतकरी मोठ्या प्रमाणावर उन्हाळी भुईमुगाची लागवड करतात. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही या पिकाला पाण्याचा ताण सहन करावा लागत आहे.
वाहतुकीसाठी ट्रॅक्टर-ट्रॉली मिळण्यात अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. कडक उन्हामुळे कांदा काढणीदरम्यान अनेक मजुरांना उष्णतेचा त्रास होत आहे. चक्कर येणे, उलट्या, मळमळ अशा महिला मजुरांच्या तक्रारी वाढल्या असून, काही ठिकाणी उष्माघाताच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे कामाचा वेग मंदावला आहे. यंदा अवकाळी पावसाने तयार झालेला कांदा वेळेवर काढणीकरिता आली नाही. कांद्याची प्रत खालावल्याने दुय्यम दर्जाचा कांदा तयार झाला आहे. त्यातच दर नसल्याने कांद्याचा भांडवली खर्चही वसूल होणार नाही.
सदाशिव गाडे, कांदा उत्पादक शेतकरी