पुणे: महापालिकेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने होणाऱ्या फसवणुकीच्या घटना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे महापालिकेच्या कंत्राटी तसेच कायमस्वरूपी नोकरभरतीसंदर्भातील प्रत्येक आदेशावर ‘क्यूआर कोड’ देण्यात येणार असून, नागरिकांना त्या कोडद्वारे आदेशाची सत्यता तपासता येणार आहे. येत्या 5 जूनपासून या नव्या प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांनी दिली.
महापालिकेच्या नावाने बनावट नियुक्तिपत्रे तयार करून बेरोजगार तरुणांची फसवणूक करण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून महापालिकेचे बोधचिन्ह तसेच अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या वापरून बनावट आदेश तयार केले जात आहेत. हे आदेश इतके खरे वाटतात की, त्यांची पडताळणी करण्यात प्रशासनालाही वेळ लागत असल्याचे नायर यांनी सांगितले.
या प्रकारांना आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रत्येक नोकरभरती आदेशावर क्यूआर कोड देण्याचा निर्णय घेतला आहे. हा कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित आदेशाची अधिकृत प्रत थेट महापालिकेच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना नियुक्ती आदेशाची खातरजमा करणे सोपे होणार आहे. तसेच, नोकरभरती प्रक्रियेतील प्रत्येक प्रस्तावाची फाईल सुरुवातीपासूनच ट्रॅक केली जाणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.
महापालिकेत कायम कर्मचाऱ्यांपेक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याने विशेषतः चतुर्थ श्रेणीतील नोकऱ्यांचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केली जाते. बेरोजगारीमुळे अनेक तरुण अशा फसवणुकीला बळी पडत असून, लाखो रुपयांचा गंडा घातला जात आहे. दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारच्या फसवणुकीमुळे एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान जिल्हा पोलिसांनी महापालिकेकडे काही मुद्द्यांवर खुलासा मागविला होता. त्या वेळी 2014 पासून महापालिकेत सरळसेवेची भरती बंद असल्याचे तसेच बनावट नियुक्तिपत्रात आयुक्तपदाचे नावही चुकीचे नमूद करण्यात आल्याचे प्रशासनाने निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे संबंधित नियुक्तिपत्र पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले होते. आत्महत्या केलेल्या युवकाच्या व्हॉट्सॲपमध्ये 13 जणांची नावे आढळली असून, त्यामध्ये महापालिकेचा कोणताही कर्मचारी सहभागी असल्यास पोलिसांना माहिती दिली जाईल, असेही नायर यांनी नमूद केले.