Money Pudhari
पुणे

Pune Municipal Corporation Rent Arrears: पुणे महापालिकेचीच कोट्यवधींची थकबाकी; मालमत्ता भाड्यापोटी ३५ कोटी अडकले

करवसुलीसाठी कठोर कारवाई करणारी पालिका स्वतःच्या भाडेवसुलीत अपयशी; हजारो मालमत्तांचे भाडे थकीत

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सामान्य पुणेकरांकडून मिळकतकर आणि पाणीपट्टीची दमडी-दमडी वसूल करण्यासाठी जप्तीची कारवाई करणारी महानगरपालिका स्वतःच्या हक्काची वसुली करण्यात मात्र पूर्णपणे अपयशी ठरल्याचे समोर आले आहे.

महापालिकेच्या मालकीच्या हजारो सदनिका, इमारती आणि मोकळ्या जागांच्या भाड्यापोटी तब्बल ३५ कोटी ४४ लाख २८ हजार ६१० रुपयांची अवाढव्य थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. महापालिकेच्या मोक्याच्या मालमत्तांचा वापर करून खासगी कमाई करणाऱ्या भाडेकरूंनी महापालिकेला चुना लावला असून, प्रशासन मात्र थकबाकीदारांवर कारवाई करण्यास कमालीचे सुस्त असल्याचे चित्र आहे.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी नगरसेवक देवेंद्र वडके यांनी मालमत्ता विभागाच्या कारभारावर आणि थकीत भाड्यावर लेखी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला मिळालेल्या अधिकृत उत्तरातून महापालिकेच्या ढिम्म कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत. या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या मालकीच्या एकूण १ हजार १३२ सदनिका, २६३ भव्य इमारती (भवन) आणि १ हजार ५५२ मोकळ्या जागा आहेत. या मालमत्तांचे भाडे वेळेत वसूल न केल्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर अत्यंत प्रतिकूल परिणाम झाला आहे.

२४ कोटींची थकबाकी केवळ जमिनींच्या भाड्यापोटी!

एकूण थकबाकीमधील सर्वाधिक धक्कादायक वाटा हा मोकळ्या जागा आणि जमिनींच्या भाड्याचा आहे. महापालिकेच्या १ हजार २१३ जमिनींच्या भाड्यापोटी तब्बल २४ कोटी ९९ लाख १० हजार १६३ रुपये थकले आहेत. अनेक कंत्राटदार आणि संस्थांनी महापालिकेच्या जागा कवडीमोल भाड्याने घेऊन त्यावर स्वतःचा व्यवसाय थाटला आहे, मात्र त्याचे भाडे पालिकेला दिलेले नाही. सदनिका आणि इमारतींची थकबाकी देखील कोट्यवधींच्या घरात असून, थकबाकीदारांच्या या मनमानीमुळे प्रामाणिक करदात्या पुणेकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

तपासणी आणि कारवाई कधी? पुणेकरांचे लक्ष

तब्बल ३५ कोटींहून अधिक रुपयांच्या थकीत भाड्यापैकी प्रत्यक्षात किती रक्कम वसूल होणार आणि पुणे महापालिका प्रशासन या थकबाकीदारांवर काय कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. थकबाकीदारांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होणार की दरवेळेसारखे केवळ नोटीसचे कागदी घोडे नाचवले जाणार, असा परखड सवाल उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT