पुणे: शहरातील पावसामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुणे महापालिकेच्या पथ विभागाने एका महिन्यात १६ हजार ५३९ चौरस मीटर खड्डे बुजविले असल्याचा दावा केला आहे. यामध्ये धनकवडी-आंबेगाव, औंध-बाणेर, कॅन्टोन्मेंट हद्दीत सर्वाधिक खड्डे बुजविण्यात आल्याचे महापालिकेकडून देण्यात आलेल्या आकडेवारीत स्पष्ट करण्यात आले आहे.
पावसामुळे शहरातील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यावरून महापालिकेला पुणेकरांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्यावर महापालिकेच्या पथ विभागाने दि. ७ जुलै ते दि. ६ ऑगस्ट या कालावधीत किती खड्डे बुजविले याची आकडेवारी दिली आहे.
त्यानुसार खड्डे बुजविण्यासाठी हॉटमिक्स प्लांटचा सर्वाधिक वापर करण्यात आला. या माध्यमातून २२ हजार ४४६ चौ.मी. क्षेत्रातील खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली, तर कोल्डमिक्स बॅगद्वारे २ हजार ५३० चौ.मी., जीएसबी साहित्य वापरून २ हजार ४५४ चौ.मी. आणि पेव्हिंग ब्लॉक बसवून २०१ चौ.मी. क्षेत्रातील खड्डे दुरुस्त करण्यात आले.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय आकडेवारीनुसार धनकवडी-आंबेगाव-कात्रज विभागात सर्वाधिक ३ हजार ६७२ चौ.मी. खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली. यामध्ये १ हजार ६३७ चौ.मी. कोल्डमिक्स, १ हजार ५४२ चौ.मी. हॉटमिक्स आणि ६२३ चौ.मी. जीएसबीचा वापर करण्यात आला.
एकिकडे महापालिकेकडून खड्डे बुजविण्याचे काम मोठ्या प्रमाणात झाल्याचा दावा केला जात असला, तरी शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर अद्याप खड्ड्यांचा प्रश्न कायम असल्याने पालिकेच्या खुड्डे बुजविण्याच्या आकडेवारीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रत्यक्षात किती खड्डे कायमस्वरूपी बुजविण्यात आले आणि किती ठिकाणी तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली, याची आकडेवारी मात्र देण्यात आलेली नाही.