Pune Potholes: बैठकांचा धडाका, खड्डे मात्र कायम; महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

पाहणी, सूचना आणि आढावे सुरूच; रस्त्यांवरील विदारक स्थितीमुळे नागरिकांचा वाढला संताप
Pune Potholes
Pune PotholesPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत असताना महापालिका प्रशासन मात्र बैठका, पाहणी आणि सूचनांच्या फेऱ्यांमध्येच अडकल्याचे चित्र आहे. नागरिकांना जीव मुठीत धरून खड्ड्यांतून प्रवास करावा लागत असताना प्रत्यक्ष दुरुस्तीची कामे मात्र संथगतीने सुरू आहेत.

परिणामी, रस्ते सुरक्षित करण्याऐवजी कागदोपत्री आढावे आणि बैठकींचाच धडाका सुरू असल्याने महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राजकीय पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्याने आढावे घेतले जात असले, तरी शहरातील रस्त्यांची विदारक अवस्था कायम असल्याने नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे.

Pune Potholes
SIR Process Impact: एसआयआरच्या कामामुळे महापालिकेची विकासकामे ठप्प; आयुक्तांची कबुली

पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी डांबरी थर पूर्णपणे उखडल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असून, दुचाकीस्वारांचे हाल होत आहेत. दुचाकी घसरून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाही खड्डे बुजवण्याची मोहीम अपेक्षित वेगाने राबवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका होत आहे.

अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात खडी किंवा कोल्डमिक्स टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी पुढील पावसात हेच खड्डे पुन्हा उघडे पडत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही रस्त्यांची गुणवत्ता कायम राहत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

Pune Potholes
Aadhaar Registration Centre: आधार केंद्रात नागरिकांची हेळसांड; ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांगांची मोठी गैरसोय

दरम्यान, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शहरातील रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाच ते सहा झोनमधील अधिकारी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे अहवाल सादर करणार असून, ज्या ठिकाणी खड्डे आढळतील ते तातडीने बुजवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, रस्तेदुरुस्तीच्या कामाचा दर्जाही तपासण्यात येणार आहे. नागरिकांना त्रास होऊ नये, शहर सुस्थितीत दिसावे आणि प्रशासनाने जबाबदारीने काम करावे, असे भिमाले यांनी स्पष्ट केले.

गेल्या वर्षापेक्षा खड्डे कमी; महापौरांच्या दाव्यावर आश्चर्य

शहरात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खड्ड्यांची संख्या कमी असल्याचा दावा महापौर मंजूषा नागपुरे यांनी केला. मात्र, प्रमुख रस्त्यांवरील विदारक स्थिती, सातत्याने घडणारे अपघात आणि नागरिकांकडून होत असलेल्या तक्रारी पाहता या दाव्यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पाऊस पडला की खड्डे पडतात, असे सांगत परिस्थितीचे समर्थन केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली असून, खड्ड्यांच्या प्रश्नावरील जबाबदारी झटकण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news