

पुणे: महापालिकेतील अनेक विकासकामांचा वेग मंदावण्यामागे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रिया हेही एक महत्त्वाचे कारण असल्याची स्पष्ट कबुली महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे.
मोठ्या संख्येने अधिकारी आणि कर्मचारी एसआयआरच्या कामात गुंतल्यामुळे शहरातील अनेक विकासकामांवर परिणाम झाल्याचे त्यांनी मान्य केले. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांच्या निवारणातही विलंब होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एसआयआर कार्यक्रम अधिक प्रभावी पद्धतीने राबविण्यासाठी महापालिकेचे तब्बल ८० टक्के मनुष्यबळ तैनात केले आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेळ काढावा लागत आहे.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार निश्चित कालमर्यादित 'एसआयआर'चे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, याबाबतच्या सूचना महापालिका आयुक्त नवल किशोर राम व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यापूर्वी दिल्या आहेत.
परिणामी पथ, पाणीपुरवठा, ड्रेनेज, बांधकाम आणि इतर विभागांतील नियमित कामांवर त्याचा थेट परिणाम झाला. अनेक अधिकारी क्षेत्रीय पाहणीऐवजी एसआयआरच्या कामात व्यस्त असल्याने विकासकामांचा वेग कमी झाला आहे.
शहरात पावसाळ्यामुळे रस्ते, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, अतिक्रमण आणि इतर नागरी प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनाचे पूर्ण लक्ष शहरातील समस्यांवर असणे अपेक्षित असताना, अधिकारी निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कामांमध्ये गुंतल्याने नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित राहत आहे.
महापालिकेने गेल्या काही महिन्यांत विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढल्या असल्या, तरी त्यांची अंमलबजावणी अपेक्षित वेगाने झालेली नाही. त्यामागे मनुष्यबळाची कमतरता आणि एसआयआरमधील व्यस्तता ही दोन प्रमुख कारणे असल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी मान्य केले आहे. प्रशासनाने आता एसआयआरचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व विभागांना पुन्हा विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
एसआयआरमुळे प्रभावित झालेली प्रमुख कामे
रस्तेदुरुस्ती
पाणीपुरवठा
योजनांचे काम
ड्रेनेजदुरुस्ती
क्षेत्रीय पाहणी
नागरिकांच्या तक्रारींचे निवारण
विविध विकास प्रकल्पांचा वेग
एसआयआरच्या कामासाठी आमचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणावर कार्यरत होते. त्यामुळे काही नियमित विकासकामांवर त्याचा परिणाम झाला, हे वास्तव आहे. आता सर्व विभागांनी पुन्हा विकासकामांवर लक्ष केंद्रित करावे, अशा सूचना दिल्या आहेत.
- नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका