पुणे: महापालिकेचा पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तांनी क्षेत्रीय कार्यालयांना अधिकार आणि निधी दोन्ही वाढवून दिले असतानाही अनेक सहाय्यक आयुक्त कामकाजात कामचुकारपणा करत असल्याचे समोर आले आहे. (Latest Pune News)
शहरातील स्वच्छता, अतिक्रमण, अनधिकृत फ्लेक्स, रस्ते व सांडपाणी यांसारख्या पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करणारे कामचुकार अधिकारी आयुक्त नवल किशोर राम यांच्या रडावरवर आले असून, गेल्या काही दिवसांत 12 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरातील समस्यांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच त्यांनी केलेल्या पाहणीत अनेक भागांतील स्वच्छतेची दयनीय स्थिती, रस्त्यांवरील सांडपाणी, पडलेला कचरा, तसेच तक्रारींचे निवारण न होणे यांसारख्या त्रुटी निदर्शनास आल्या. त्यामुळे आयुक्तांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांची थेट बदली आणि निलंबनाची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
नगरसेवक नसल्याने गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या महापालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील नियंत्रण कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक नागरिकांनी क्षेत्रीय कार्यालयांत तक्रार करूनही कामे न झाल्याची खंत व्यक्त केली आहे. काही अधिकारी उशिरा कामावर हजेरी लावणे, वेळेआधी कार्यालयातून निघून जाणे अशा प्रकारांमध्ये गुंतले असून, त्याचा परिणाम थेट शहराच्या प्रशासनावर होत आहे. आयुक्तांकडे नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने त्यांनी स्वतःच शहरभर पाहणी मोहीम सुरू केली आहे. आरोग्य, स्वच्छता, सांडपाणी, रस्ते आणि अतिक्रमण अशा विविध विषयांवरील स्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना थेट जागेवर अधिकाऱ्यांना दिल्या जात आहेत.
12 अधिकाऱ्यांवर निलंबनाची व बदलीची कारवाई
गेल्या काही दिवसांत आयुक्तांनी नगर रस्ता वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त व दोन अभियंत्यांची बदली केली. हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांचीदेखील बदली करण्यात आली. शाखा अभियंता, आरोग्य निरीक्षक व मुकादम यांचे निलंबन तर घोले रस्ता-शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आयुक्तांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, पुढील काळात निष्क्रियता, हलगर्जीपणा किंवा नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.