Pune Municipal Corporation Pudhari
पुणे

Pune Municipal Corporation Reshuffle: पुणे महापालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल; 21 अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या बदलल्या

कार्यक्षमता वाढवण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांकडून विभागीय पुनर्वाटप; डॉ. संतोष टेंगले यांची उपआयुक्तपदी नियुक्ती

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिकेच्या प्रशासनात कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांनी 21 उप आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विभागीय जबाबदाऱ्यांमध्ये व्यापक बदल केले असून, विविध विभागांचे पुनर्वाटप करण्यात आले आहे. महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील पदोन्नतीनंतर डॉ. संतोष टेंगले यांची उप आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण आणि नगरविकास विभागाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. अहिल्यानगर महापालिकेतून पदोन्नतीने पुण्यात आलेल्या डॉ. संतोष टेंगले यांच्याकडे सांस्कृतिक केंद्र आणि क्रीडा विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रसाद काटकर यांची सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याकडे निवडणूक आणि दक्षता विभागाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे.

किशोरी शिंदे यांच्याकडील पर्यावरण, मुद्रणालय आणि विशेष विभाग काढून त्यांच्याकडे सामान्य प्रशासन व तांत्रिक विभाग सोपविण्यात आले आहेत. माधव जगताप यांच्याकडे परिमंडळ क्रमांक 5 सोबत पर्यावरण, विशेष उप आयुक्त, मुद्रणालय आणि मंडई विभागाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. सोमनाथ बनकर यांचे विद्यमान विभाग कायम ठेवण्यात आले आहेत. प्रशांत ठोंबरे यांच्याकडील दक्षता विभाग प्रसाद काटकर यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

संदीप खलाटे यांच्याकडे मध्यवर्ती भांडार विभागाची अतिरिक्त जबाबदारी दिली असून, संदीप कदम यांच्याकडे मोटार वाहन आणि आकाशचिन्ह परवाना विभाग सोपवला आहे. संतोष वारुळे यांच्याकडे घनकचरा विभागाचा पूर्ण पदभार दिला. वसुंधरा बारवे यांच्याकडे शिक्षण विभागासह आकाशचिन्ह आणि परवाना विभाग कायम ठेवले. विजयकुमार थोरात यांना सामान्य प्रशासन आणि तांत्रिक विभागातून मुक्त करून परिमंडळ क्रमांक 3 ची जबाबदारी दिली आहे. आशा राऊत यांच्याकडे परिमंडळ क्रमांक 1 सोबत समाजविकास आणि समाजकल्याण विभाग सोपविण्यात आले आहेत.

तुषार बाबर यांच्याकडे माहिती व जनसंपर्क, सोशल मीडिया कक्ष आणि सुरक्षा नियंत्रण विभागाची जबाबदारी दिली आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांना प्रभारी पदभार सोपवला असून, ई-प्रशासक राहुल जगताप यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान विभाग कायम ठेवला आहे. कर आकारणी विभागाची जबाबदारी पुन्हा एकदा रवी पवार यांच्याकडेच दिली आहे. या प्रशासकीय फेरबदलामुळे विभागीय कामकाज अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा महापालिका प्रशासनाने व्यक्त केली. नव्याने जबाबदाऱ्या मिळालेल्या सर्व अधिकाऱ्यांना तत्काळ पदभार स्वीकारून त्याबाबतचे निवेदन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT