Pune Municipal Corporation Recruitment
पुणे : अगोदर लोकसभा नंतर विधानसभा आणि शेवटी महापालिका निवडणुकीसाठीच्या अशा तिन्ही आचारसंहितांचा फटका बसलेल्या महापालिकेतील बहुप्रतिक्षित कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती प्रक्रियेला अखेर नवा मुहूर्त मिळाला होता. नव्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा आता २५ जानेवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने होणार होती. मात्र, परीक्षा केंद्रावरून अनेक उमेदवारांनी तक्रारी केल्यामुळे पुन्हा या परीक्षेत विघ्न आले अन् २५ तारखेला होणारी परीक्षाच रद्द करण्यात आली.
परीक्षा केंद्रांची निवड, भौगोलिक अंतर, सुविधा आणि पारदर्शकतेअभावी ही परीक्षा अन्यायकारक ठरत असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका गेटसमोर उमेदवारांनी आंदोलनही केले. परीक्षा केंद्रांबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची शहानिशा करून त्यानंतरच नव्या तारखेची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे प्रशासन अधिकारी व उपायुक्त विजयकुमार थोरात यांनी दिली.
या भरती प्रक्रियेसाठी प्रत्येकी एक हजार रुपये परीक्षा शुल्क भरून सुमारे ४२ हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. मात्र, हॉल तिकीट मिळाल्यानंतर अनेक उमेदवारांना घरापासून ४०० ते ५०० किलोमीटर अंतरावरील खासगी परीक्षा केंद्रे देण्यात आल्याचे समोर आले. सांगलीतील उमेदवाराला लातूर, लातूरच्या उमेदवाराला कोल्हापूर, नाशिकच्या उमेदवाराला जळगाव, तर कोल्हापूरच्या उमेदवाराला अमरावती येथे परीक्षा केंद्र देण्यात आल्याची उदाहरणे उमेदवारांनी दिली आहेत. परीक्षा केंद्रांची स्थितीही अत्यंत चिंताजनक असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. गल्लीबोळांतील, टपरीसदृश इमारतींमधील परीक्षा केंद्रे, अपुऱ्या सुविधा, निकृष्ट दर्जाची संगणक व्यवस्था तसेच काही केंद्रांची खराब रेटिंग यामुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेषतः महिला उमेदवारांच्या सुरक्षिततेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली जात असून, प्रवास, राहण्याची व जेवणाची व्यवस्था यासाठी तीन ते चार हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च येत असल्याचे उमेदवार सांगत आहेत.डिसेंबर महिन्यातच उमेदवारांनी या भरती प्रक्रियेबाबत आक्षेप नोंदवले होते. परीक्षा टीसीएस आयऑनसारख्या मान्यताप्राप्त केंद्रांवर दोन ते तीन दिवसांच्या स्लॉटमध्ये घ्यावी, अशी ठोस मागणी करण्यात आली होती. त्या वेळी महापालिका आयुक्तांनीही या मागणीची दखल घेतली होती. मात्र, प्रत्यक्षात परीक्षा अवघ्या सात दिवस आधी हॉल तिकीट देऊन, खासगी केंद्रांवर आणि तेही एकाच दिवशी घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याने उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. आता परीक्षा रद्द झाल्याने हजारो उमेदवारांमध्ये पुन्हा एकदा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, पारदर्शक, सुरक्षित आणि उमेदवाराभिमुख पद्धतीने परीक्षा घेण्याची ठाम मागणी उमेदवारांकडून होत आहे.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या १६९ जागांसाठी भरती परीक्षा यापूर्वी १ डिसेंबर रोजी होणार होती. पुण्यासह राज्यातील २० शहरात ही परीक्षा घेण्याचे नियोजन केले होते. परंतु, २ डिसेंबर रोजी नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान होणार होते. त्यामुळे काही उमेदवारांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. त्यामुळे पालिकेने ही परीक्षा पुढे ढकलली. १५ डिसेंबर रोजी महापालिका निवडणुकांसाठीची आचारसंहिता लागू झाल्याने ही परीक्षा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली. अखेर १५ जानेवारी रोजी राज्यातील सर्व महापालिकांची निवडणूक झाली. १६ जानेवारी रोजी निकालही जाहीर झाला. त्यामुळे ही परीक्षा २५ जानेवारी रोजी होणार होती. मात्र, काही उमेदवारांनी आंदोलन केल्याने पुन्हा ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे.