

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरतीसाठी येत्या 25 जानेवारी रोजी होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेच्या आयोजनावर उमेदवारांकडून तीव नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. परीक्षा केंद्रांची निवड, प्रचंड भौगोलिक अंतर, अपुऱ्या सुविधा आणि पारदर्शकतेअभावी ही परीक्षा अन्यायकारक ठरत असल्याचा आरोप करीत उमेदवारांनी महापालिकेच्या मुख्य गेटसमोर आंदोलन केले.
या भरती प्रक्रियेसाठी प्रत्येकी एक हजार रुपये शुल्क भरून सुमारे 42 हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केला आहे. मात्र, हॉल तिकीट प्राप्त झाल्यानंतर अनेक उमेदवारांना घरापासून 400 ते 500 किलोमीटर दूर असलेली खासगी परीक्षा केंद्र दिल्याचे उघड झाले आहे. सांगलीतील उमेदवाराला लातूर, लातूरच्या उमेदवाराला कोल्हापूर, नाशिकच्या उमेदवाराला जळगाव, तर कोल्हापूरच्या उमेदवाराला अमरावती येथे परीक्षा देण्यास पाठवण्यात आल्याची उदाहरणे उमेदवारांनी मांडली. परीक्षा केंद्रांची गुणवत्ता व सुविधा याबाबतही उमेदवारांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. गल्लीबोळातील, टपरीसदृश इमारतींमधील केंद्र, अपुरी पायाभूत सुविधा, कमी दर्जाची संगणकव्यवस्था आणि काही केंद्रांची खराब रेटिंग. यामुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
विशेषतः महिला उमेदवारांच्या सुरक्षिततेबाबत तीव चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दूरच्या ठिकाणी परीक्षा असल्याने राहण्याची व जेवणाची व्यवस्था, प्रवासाचा खर्च. यासाठी तीन ते चार हजार रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. घरची परिस्थिती बिकट असताना एवढा खर्च करणे अनेकांसाठी अशक्य असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. डिसेंबर महिन्यातच या भरती प्रक्रियेतील त्रुटींविरोधात उमेदवारांनी आक्षेप नोंदवले होते. टीसीएस आयऑनसारख्या मान्यताप्राप्त व सुरक्षित केंद्रांवर परीक्षा दोन ते तीन दिवसांच्या स्लॉटमध्ये घ्यावी, अशी मागणी केली होती. त्या वेळी महापालिका आयुक्तांनीही या मागणीची दखल घेतली होती. मात्र, प्रत्यक्षात परीक्षा अवघ्या सात दिवस आधी हॉल तिकीट देऊन पुन्हा खासगी केंद्रांवर आणि तेही एकाच दिवशी घेण्याचा निर्णय झाल्याने उमेदवारांचा संताप वाढला आहे.
काही उमेदवारांनी या वेळी हेही स्पष्ट केले की, महापालिकेने यापूर्वी सुमारे 850 पदांची भरती याच ऑनलाइन पद्धतीने यशस्वीपणे केली होती आणि त्या वेळी कोणत्याही प्रकारच्या तक्रारी नव्हत्या. मात्र, या वेळी परीक्षा प्रक्रियेत काही स्पर्धा परीक्षा गट सक्रिय असल्याचा आरोपही उमेदवारांकडून करण्यात येत आहे. असे असले तरी, परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह ठेवणे ही महापालिकेचीच जबाबदारी असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. ‘आम्ही दंगेखोर नाही, तर फक्त न्याय मागणारे विद्यार्थी आहोत,’ अशी भावना आंदोलनातून व्यक्त झाली.
‘ही परीक्षा की अन्याय?’
एक हजार रुपये फी भरून स्वप्नं घेऊन आलो, पण दिली गेली बोगस परीक्षा केंद्रे. गल्लीबोळातील, टपरीसारखी, सुविधाशून्य आणि विश्वासही शून्य. सांगलीचा विद्यार्थी लातूरला, लातूरचा कोल्हापुरात, नाशिकचा जळगावात, कोल्हापूरचा अमरावतीत! ही परीक्षा आहे की स्थलांतराची सक्ती, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
‘मुलींच्या सुरक्षेचं काय?’
राहायचं कुठं, खायचं काय? तीन-चार हजार खर्च करून संशयास्पद केंद्रांवर परीक्षा, कॉपी सापडलेली केंद्र, बोगस नावं, पारदर्शकतेची हमी नाही. घरची परिस्थिती कठीण, डोळ्यात स्वप्नं, मनात धास्ती, अभ्यासाऐवजी प्रवासाचा ताण - अशी कुठली ही परीक्षा नीती? असा सवाल विद्यार्थिनींनी उपस्थित केला आहे.