पुणे: महापालिकेच्या शिक्षण मंडळांतर्गत पहिल्या टप्प्यात विकसित करण्यात येणाऱ्या ७५ 'मॉडेल स्कूल'च्या स्थापत्यविषयक कामांसाठी प्रशासनाने झोननिहाय स्वतंत्र निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. यापूर्वी स्थापत्य आणि विद्युतविषयक सर्व कामांसाठी एकच निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, सर्वपक्षीय नगरसेवकांच्या तीव्र आक्षेपानंतर प्रशासनाने भूमिका बदलत कामे विभागून देण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या शाळांमधील पटसंख्या वाढविणे आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, या उद्देशाने 'मॉडेल स्कूल' संकल्पना राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ७५ शाळांच्या इमारतींची आवश्यक दुरुस्ती करून एकसमान रंगसंगती केली जाणार आहे. तसेच वर्गखोल्यांमध्ये पुरेशी प्रकाश व्यवस्था, विद्यार्थ्यांसाठी आकर्षक व शैक्षणिक भित्तिचित्रे, दर्जेदार बैठक व्यवस्था, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहे, ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक साधनसामग्री आणि शिक्षकांच्या गुणवत्तावृद्धीसाठी कार्यशाळा अशा विविध सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.
शाळांच्या परिसराचे सुशोभीकरण आणि इमारतींच्या स्थापत्य विषयक कामांचाही यात समावेश आहे. सुरुवातीला ही सर्व कामे आणि विद्युतविषयक कामे एकाच ठेकेदारामार्फत करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, त्यामुळे कामांना विलंब होण्याची तसेच अनेक शाळांची कामे अर्धवट राहण्याची शक्यता व्यक्त करत नगरसेवकांनी विरोध केला होता.
त्यानंतर प्रशासनाने महापालिकेच्या पाच झोननुसार स्थापत्य आणि विद्युतकामांसाठी स्वतंत्र निविदा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्थापत्य कामांसाठी पाच स्वतंत्र निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या असून, विद्युतविषयक कामांसाठीही लवकरच स्वतंत्र निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
शिक्षण मंडळाच्या ७५ मॉडेल स्कूलच्या इमारतींतील स्थापत्य विषयक कामांसाठी झोननिहाय स्वतंत्र निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर विद्युतविषयक कामांसाठीही लवकरच स्वतंत्र निविदा काढण्यात येतील.बिपीन शिंदे, अधीक्षक अभियंता, भवन रचना विभाग