Garbage Management Pudhari
पुणे

Pune Solid Waste Management Controversy: पुणे महापालिकेत घनकचरा विभागात मोठी फेररचना

कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या वादानंतर आयुक्तांचा निर्णय; विभाग दोन स्वतंत्र गटांमध्ये विभाजित करून नव्या अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपवली

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कचरा प्रक्रिया प्रकल्प विनानिविदा देण्याच्या प्रस्तावावरून निर्माण झालेल्या वादानंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागात मोठा प्रशासकीय बदल केला आहे. विभागाचे काम अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने कचरा संकलन आणि कचरा प्रक्रिया असे दोन स्वतंत्र गट केले असून, या दोन्ही गटांची जबाबदारी स्वतंत्र अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे.

दरम्यान, 600 टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम ‌’भूमिग््राीन‌’ या कंपनीला विनानिविदा देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने पुढे आणला होता. हा प्रस्ताव आयुक्तांना मान्य नसल्याने त्यांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आयुक्तांनी विभागीय रचनेतच बदल करण्याचा निर्णय घेतला.

नवीन आदेशानुसार, घनकचरा विभागाचे दोन स्वतंत्र गट करण्यात आले आहेत. परिमंडळ दोनचे उपायुक्त संतोष वारुळे यांच्याकडे कचरा संकलन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर निवडणूक विभाग व परिमंडळ तीनचे उपायुक्त प्रसाद काटकर यांच्याकडे कचरा प्रक्रिया विभागाची धुरा सोपविण्यात आली आहे.

याशिवाय, अविनाश सकपाळ यांना परिमंडळ दोन आणि मागासवर्ग विभागाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी नव्याने सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या तत्काळ स्वीकारून त्याबाबतचा अहवाल प्रशासनाकडे सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

विभागाच्या कामकाजात सुधारणा न झाल्याने निर्णय

घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यपद्धतीबाबत आयुक्त राम सुरुवातीपासूनच असमाधानी होते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी तत्कालीन उपायुक्त संदीप कदम यांची अचानक बदली करून त्यांच्या जागी अविनाश सकपाळ यांची नियुक्ती केली होती. मात्र, त्यानंतरही विभागाच्या कामकाजात अपेक्षित सुधारणा झाली नाही. त्यामुळे घनकचरा विभागाचे दोन स्वतंत्र गट करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT