

जेजुरी: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने आळंदी ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 विकसित करण्यात येत आहे. या मार्गावर बेलसर फाटा जवळ टोल नाका सुरू करण्यात आला आहे. या टोलचा भुर्दंड पुरंदर तालुक्यातील नागरिकांना सोसावा लागणार आहे. तसेच वारकरी बांधवांना, खंडोबा भक्तांना टोलचा फटका बसणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 विकसित होत असताना जेजुरी शहरातील सुमारे दीडशे मालमत्तांचे अधिग््राहण करण्यात आले. शहरातून हा महामार्ग विकसित करण्यास नागरिकांचा विरोध होता. बाह्यवळण करावे, अशी नागरिकांची मागणी होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या महामार्गासाठी अनेक घरे, दुकाने, शेतीचे संपादन झाले.
अनेकांची उदरनिर्वाहाची साधने गेली. आता टोलचा भुर्दंड कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच दिवे घाटात रस्त्याचे काम सुरू असताना टोल वसुलीची घाई का? असा सवाल टोलविरोधकांनी केला आहे. सासवड, जेजुरी, निरा, वाल्हे येथून दररोज शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी घेऊन येतात. तसेच जेजुरी एमआयडीसीमध्ये येणारे कामगार, उद्योजक यांनादेखील टोलचा फटका बसणार आहे. पुरंदर तालुक्यातील सर्व गावांतील नागरिकांच्या वाहनांकडून टोल वसुली केली जाऊ नये, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली आहे.
टोलबाबत येत्या मंगळवारी निर्णय
नव्याने सुरू झालेल्या या टोल नाक्यावर टोल शुल्क चे फलक लावण्यात आले आहेत. 105 ते 665 रुपये चारचाकी व मोठ्या वाहनांसाठी एकेरी शुल्क असून, परतीच्या या वाहनासाठी 155 रुपये ते 1000 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच वीस किलोमीटर अंतरावरील वाहनासाठी मासिक पास साडेतीनशे रुपये आहे.
या नाक्यावर शुक्रवार (दि. 24) पासून टोलवसुलीला सुरुवात झाली. निरा, वाल्हे, जेजुरी, सासवड तसेच नाझरे, कोथळे, रानमळा, साकुर्डे, बेलसर, तक्रारवाडी, भोंगळेमळा, वाळुंज, नीलुंज, शिवरी आदी गावातील नागरिकांनी स्थानिकांकडून टोल आकारू नये, अशी मागणी केली आहे. मंगळवार (दिनांक 28) रोजी याबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले. मंगळवारी याबाबत ठोस निर्णय न झाल्यास मोठे आंदोलन होण्याची शक्यता आहे.