

पुणे: पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग््राामीण भागातील 18 वर्षांपर्यंत वय असलेल्या सुमारे साडेपाच लाखांहून अधिक बालकांचे आधारकार्ड अद्ययावत केले नसल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक 5 ते 15 वयोगटांतील तीन लाख 43 हजार आणि 15 वर्षांपुढील सुमारे अडीच लाख बालकांचा समावेश आहे. त्यामुळे पालकांनी तातडीने पाल्याचे आधारकार्ड अद्ययावत केले नाही, तर संबंधित आधारकार्ड निष्क्रिय अथवा रद्द होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
केंद्र सरकारतर्फे देशात वन नेशन वन कार्ड या संकल्पनेला अनुसरून शासकीय योजनांचा लाभ देण्यात येत आहे. त्यानुसार यूआयडीएआयने सप्टेंबर 2010 सालापासून भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी ओळखीचा पुरावा म्हणून आधारकार्डला अधिकृत मान्यता दिली आहे. त्यानुसार पाच वर्षांच्या आत पालकांच्या आधार क्रमांकाशी संलग्न आधारकार्ड काढणे बंधनकारक आहे. जेणेकरून शैक्षणिक प्रयोजनार्थ, तसेच इतर शासकीय सुविधांचा लाभ मिळविण्यासाठी आधारकार्ड हा एकमेव पुरावा जो ग््रााह्य धरला जात आहे. मात्र, लहान मुलांची वयाच्या 18 वर्षांपर्यंत वाढ होत असून, शरीररचनेतही बदल होत असतो. प्रामुख्याने तळहातांचे ठसे, डोळे, बोटांचे ठसे (बायोमेट्रिक) बदलत असतात. त्यामुळे पाच वर्षांनंतर प्रथम आधार अद्ययावत करणे बंधनकारक केले आहे. तसेच, 5 ते 15 वर्षांमध्ये प्रतितीन वर्षांनी मुलांचे आधारकार्ड अद्ययावत करावे, अशा सूचना दिल्या आहेत.
याबाबत जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर वेळोवेळी माहिती, जनजागृती आणि मोहीम राबवूनही पालकांकडून पाल्यांचे आधार अद्ययावत करण्यासाठी प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरासह जिल्ह्यातील सात हजार 379 शाळा आहेत. ज्या शाळांमधील 5 ते 15 वयोगटांतील तीन लाख 43 हजार 187 लहान मुले आणि 15 वर्षांपुढील दोन लाख 53हजार 652 अशा एकूण पाच लाख 96 हजार 839 लहान मुलांचे आधारकार्ड अद्ययावत केलेले नाही.
पालक आणि शाळांना आवाहन
जिल्हा प्रशासनाने पालक आणि विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेंतर्गत 5 ते 15 आणि 15 वर्षांपासून पुढील विद्यार्थ्यांसाठी आधारकार्ड अद्ययावतीकरण मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी तालुका पातळीवर नोडल अधिकारी नियुक्त करून या शाळांमध्ये शिबिर आयोजित करण्यात येत आहेत. तसेच, खासगी आणि शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी पालकांनी नजीक असलेले आधार केंद्र अथवा क्षेत्रीय कार्यालयात जाऊन आधार अद्ययावत करावे. तसेच शाळांनी देखील या मोहिमेत सहभाग घेऊन पाल्यांचे आधार अद्ययावतीकरण करून घेण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
काय होणार?
यूआयडीएआयच्या निकषानुसार बायोमेट्रिक ठसे बदलत असल्याने ठराविक कालावधीत बदलले नाही, तर शैक्षणिक प्रयोजनार्थ शाळा, महाविद्यालयात प्रवेश मिळवताना, तसेच शिष्यवृत्ती रक्कम थेट बँक खात्यात (डीबीटी) पडणार नाही. तसेच, शालेय प्रमाणपत्र अथवा महत्त्वाच्या परीक्षांना बसता येणार नसून सरकारी योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे. प्रामुख्याने दिलेला कालावधी उलटून गेल्यानंतर संबंधित आधारकार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. आधारकार्ड निष्क्रिय अथवा रद्द ठरविण्यात आल्यावर पालकांना नव्याने आधारकार्ड काढण्यासाठी मुख्यालयाच्या ठिकाणी जाऊन अर्ज, कारणे देऊन आधारकार्ड काढावे लागणार असल्याचे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
यूआयडीएआयच्या निर्देशानुसार आधार अद्ययावतीकरण करण्यासाठी वेळोवेळी आवाहन करण्यात आले असून, विशेष मोफत कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. अवधीमध्ये वाढ करूनही प्रतिसाद नसल्याचे समोर आले असून, ज्या पालकांनी आपल्या मुलांचे आधारकार्ड अद्याप अद्ययावत केलेले नाही, त्यांनी तातडीने आधारकार्ड अद्ययावत करून घ्यावे. अन्यथा, आधार निष्क्रिय अथवा रद्द होऊ शकते.
पल्लवी घाडगे, उपजिल्हाधिकारी तथा आधार समन्वयक, पुणे