Pune Encroachment Removal Drive Pudhari
पुणे

Pune Encroachment Removal Drive: पुण्यात अतिक्रमणांवर महापालिकेचा बुलडोझर; एकाच दिवसात ३.५८ लाख चौ. फूट जागा मोकळी

म्हात्रे पुलाजवळ चार वर्षांनंतर धडक कारवाई; डीपी रस्त्यावरील अडीच लाख चौ. फूट क्षेत्र अतिक्रमणमुक्त, रविवारीही मोहीम सुरू राहणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात अतिक्रमणविरोधी मोहिमेने शनिवारी अक्षरशः रौद्ररूप धारण केले. शहराच्या मध्यवर्ती भागापासून उपनगरांपर्यंत महापालिकेच्या पथकांनी एकाच वेळी धडक कारवाई करीत तब्बल ३ लाख ५८ हजार ७४० चौरस फूट जागा अतिक्रमणमुक्त केली. विशेष म्हणजे, चार वर्षांनंतर म्हात्रे पुलाजवळील डीपी रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. या ठिकाणी सुमारे अडीच लाख चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. मंडईसह मध्यवर्ती पेठा, कोंढवा, घोरपडी, मुंढवा आणि सूस परिसरातही अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरविण्यात आला.

महापालिकेच्या बांधकाम परवाना आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाने संयुक्तपणे ही मोहीम राबविली. कोंढवा बुद्रुक, सोमजी चौक आणि आंबेडकरनगर परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. सूस-नांदे मुख्य रस्त्यावरील अनधिकृत बांधकामांवरही कारवाई करण्यात आली. घोरपडीतील बी. टी. कवडे रस्ता आणि मुंढवा चौक परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. मध्यवर्ती पुण्यातही कारवाईचा जोर कायम होता. रविवार पेठ, शुक्रवार पेठ, बाजीराव रस्ता आणि केळकर रस्ता परिसरातील सुमारे साडेतीन हजार चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली. मंडई परिसरातील अनधिकृत फुलविक्रेते आणि अन्य अतिक्रमणांवरही कारवाई करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती.

दरम्यान, राजाराम पूल ते म्हात्रे पूल परिसरातील मंगल कार्यालये आणि हॉटेल्सच्या अनधिकृत शेड्स व बांधकामांवर सकाळपासूनच कारवाई करण्यात आली. न्यायालयाची स्थगिती असलेली तसेच मान्यताप्राप्त बांधकामे कारवाईतून वगळण्यात आल्याचे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले. आयुक्त नवल किशोर राम यांनी सिंहगड रस्त्यावरील रामकृष्ण मठ परिसर आणि कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या भागांची पाहणी केली. पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासह नियमित स्वच्छता राखण्याचे निर्देश त्यांनी दिले. कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. रविवारी सुटीच्या दिवशीही अतिक्रमणांविरोधातील मोहीम सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

म्हात्रे पुलाजवळ चार वर्षांनंतर कारवाई!

राजाराम पूल ते म्हात्रे पूल परिसरातील डीपी रस्त्यावर तब्बल चार वर्षांनंतर महापालिकेने अतिक्रमणविरोधी कारवाई केली. मंगल कार्यालये आणि हॉटेल्सच्या अनधिकृत शेड्स व बांधकामांवर कारवाई करून सुमारे अडीच लाख चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली. न्यायालयाची स्थगिती असलेली आणि मान्यताप्राप्त बांधकामे मात्र वगळण्यात आली. शनिवारी दिवसभरात शहरभरात एकूण ३ लाख ५८ हजार ७४० चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली. गेल्या काही दिवसांतील ही सर्वात मोठी कारवाई ठरली.

वारजेतील कारवाईची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

शहरातील अतिक्रमणविरोधी मोहिमेचा जोर कायम ठेवत महापालिका प्रशासनाने वारजे परिसरातील कारवाईची वरिष्ठपातळीवर पाहणी केली. वारजे क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेची अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि उपायुक्त थोरात यांनी शनिवारी (ता. २८) प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी संबंधित क्षेत्रातील सुरू असलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला. सार्वजनिक रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणे हटवून नागरिकांसाठी ते मोकळे ठेवण्याच्या दृष्टीने कारवाई नियमित आणि प्रभावीपणे सुरू ठेवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले. तसेच, अतिक्रमण हटाव मोहिमेची कारवाई नियोजनबद्ध व तत्परतेने पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. अतिक्रमणांमुळे पादचारी आणि वाहनचालकांना होणारा त्रास टाळण्यासाठी रस्ते व पदपथ मोकळे ठेवण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. या मोहिमेत सातत्य राखून प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT