पांडुरंग सांडभोर
पुणे: पुणे महापालिकेची निवडणूक लढविणाऱ्या 1 हजार 153 पैकी 750 उमेदवारांची अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त करण्यात आले आहे. प्रमुख राजकीय पक्षांमध्ये शिवसेनेच्या सर्वाधिक 87 उमेदवारांचा समावेश असून, त्यापाठोपाठ आपचे 81, तर तिसऱ्या क्रमांकावर काँग््रेासच्या 50 उमेदवारांचा समावेश आहे. तर, महापालिकेत 119 जागा जिंकणाऱ्या भाजपच्याही चार उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
तब्बल चार वर्षे रखडलेल्या महापालिकांच्या निवडणुका जानेवारी महिन्यात पार पडल्या. दि. 16 जानेवारीला महापालिकेचे निकाल जाहीर झाले. भाजपने सर्वाधिक 119, त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग््रेासने 27, काँग््रेास 15, राष्ट्रवादी काँग््रेास (श.प) 3 आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 1 जागा मिळाली. त्याचबरोबर आता महापालिकेच्या निवडणूक विभागाने निवडणुकीत पराभूत झालेल्या किती उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे, याची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेच्या सर्वाधिक 87 उमेदवारांचा समावेश आहे. भाजपसमवेत युती तुटल्याने शिवसेनेने 120 जागा लढविल्या होत्या, त्यात एकही जागा शिवसेनेला जिंकता आली नाही, तर महाविकास आघाडीत एकत्र निवडणूक लढविणाऱ्या काँग््रेासने 92 जागा लढविल्या होत्या. त्यामधील 50 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेने 62 जागा लढविल्या होत्या, त्यामधील 42 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
आघाडीत असलेल्या मनसेने 44 जागा लढविल्या होत्या, त्यांना एकाही जागेवर विजय मिळविता आला नव्हता, उलट 31 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग््रेासने एकत्र निवडणूक लढविली होती. त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सर्वाधिक 139 जागा लढविल्या होत्या. त्यामधील 14 उमेदवारांचे, तर 34 जागा लढविणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 19 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. याशिवाय, आम आदमी पक्षाने 81 जागी उमेदवार उभे केले होते. त्यात आपच्या सर्वच्या सर्व 81 जागांवरील उमेदवारांचेही डिपॉझिट जप्त झाले आहे.
...अशी होते अनामत रक्कम जप्त
महापालिकेच्या प्रभागातील ज्या गटातून उमेदवाराने निवडणूक लढविली आहे. त्यामध्ये नोटाला पडलेली मते वगळून अन्य सर्व उमेदवारांना पडलेल्या मतांची सरासरी मतांची आकडेवारी काढली जाते. त्या सरासरी मतांच्या एक अष्टांशपेक्षा कमी मते ज्या उमेदवारांना पडतात, त्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली जाते. त्यात सर्वसाधारण गटातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला 5 हजार, तर आरक्षित गटासाठी 2 हजार पाचशे रुपये इतकी अनामत रक्कम निवडणुकीत अर्जासमवेत भरावी लागते.
भाजपचे एकाच प्रभागातील सर्व उमेदवार
सर्वच्या सर्व 163 जागा लढविणाऱ्या भाजपच्या 4 उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले आहे. हे चारही उमेदवार प्रभाग क्र. 19 कोंढवा खुर्द - कौसर बाग या प्रभागातील आहे. हा सर्व भाग मुस्लिम बहुल असून, या प्रभागात सर्वच्या सर्व चारही मुस्लिम उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यात काँग््रेासचे तीन, तर राष्ट्रवादी पवार गटाच्या एका उमेदवाराचा समावेश आहे.
‘त्या’ 422 उमेदवारांमध्ये अपक्षांची संख्या सर्वाधिक
निवडणूक लढविणाऱ्या 1 हजार 153 पैकी ज्या 750 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. त्यामध्ये प्रमुख राजकीय पक्षांच्या 328 उमेदवारांचा समावेश आहे. उर्वरित 422 उमेदवारांमध्ये वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी यांच्यासह अन्य छोट्या पक्षांचा, तसेच सर्वाधिक अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.