पुणे: पावसाळी कामे करणाऱ्या बड्या ठेकेदाराला वाचविण्यासाठी महापालिकेने चक्क मुख्य सभेलाच खोटी माहिती दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एम. बी. पाटील कन्स्ट्रक्शन असे या ठेकेदार कंपनीचे नाव असून, या ठेकेदाराकडील कामे सुरू झाली नसतानाही महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाने मात्र मुख्य सभेच्या प्रश्नोत्तरात कामे सुरू असल्याची माहिती दिली होती.
गत आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शहरात अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे महापालिकेच्या पावसाळी कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यातच पावसाळी कामे करणाऱ्या ठेकेदाराला महापालिका कशा पद्धतीने वाचविण्याचे काम करते, याचा धक्कादायक नमुना पुढे आला आहे.
राष्ट्रवादी काँग््रेासचे नगरसेवक सुहास टिंगरे यांनी प्रशासनाच्या या कारभाराचा पर्दाफाश केला आहे. टिंगरे यांनी मुख्यसभेच्या प्रश्नोत्तरात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत वडगाव शेरी मतदारसंघात 22 कामांबद्दल माहिती विचारली होती. एम. बी. पाटील या ठेकेदाराला दोन वर्षांपूर्वी ही कामे दिली होती. मलनिस्सारण विभागाने 22 कामांपैकी 4 कामे पूर्ण झाल्याची, तर 10 कामे सुरू असल्याचे उत्तर दिले होते.
या माहितीनंतर नगरसेवक टिंगरे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता, केवळ 2 कामे सुरू असल्याचे आढळून आले. टिंगरे यांनी हा प्रकार स्थायी समितीच्या बैठकीत निदर्शनास आणला. त्यावर संबंधित अभियंते व प्रायमो कन्सल्टंट कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मात्र, संबंधित ठेकेदार कंपनीवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
शहरातील पूरपरिस्थितीला केवळ अवकाळी पाऊसच जबाबदार नसून महापालिकेने पोसलेले ठेकेदारही जबाबदार आहेत. या ठेकेदारांवर प्रशासनाने कारवाई करावी.सुहास टिंगरे, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग््रेास.