पुणे: महापालिकेच्या अंदाजपत्रकातील विकासकामांचा निधी एका प्रभागासाठी मंजूर होऊन दुसऱ्याच प्रभागात वळवण्याच्या प्रकारांना आता आयुक्त नवल किशोर राम यांनी चाप लावला आहे. मुख्य खात्यांसाठी मंजूर केलेल्या आर्थिक तरतुदी क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील कामांसाठी परस्पर उपलब्ध करून देऊ नये, असे स्पष्ट आदेश परिपत्रक काढून त्यांनी दिले आहेत. याबाबत दै. 'पुढारी'ने वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत आयुक्त राम यांनी हे आदेश दिले आहेत.
महापालिकेच्या अंदाजपत्रकात विविध विकासकामांसाठी मुख्य खाती आणि क्षेत्रीय कार्यालयांना स्वतंत्रपणे निधीची तरतूद केली जाते. संबंधित विभागांनी सुचविलेल्या कामांच्या आधारे ही आर्थिक तरतूद निश्चित असते. मात्र, मुख्य खात्यांसाठी मंजूर झालेला निधी क्षेत्रीय कार्यालयांच्या अखत्यारीतील कामांसाठी वळवला जात होता.
याबाबत 'अंदाजपत्रकातील निधीची भाजप नगरसेवकाकडून पळवा पळवी' या मथळ्याखाली दै. 'पुढारी'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत आयुक्त नवल किशोर राम यांनी ही पद्धत आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने योग्य नसल्याचे नमूद करत त्यांनी खातेप्रमुखांना स्वतःच्या खात्याचा निधी क्षेत्रीय कार्यालयांच्या कामांसाठी परस्पर उपलब्ध करून न देण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, प्रभाग क्रमांक २२ मधील कासेवाडी-डायस प्लॉट परिसरातील विकासकामांसाठी आयुक्तांनी अंदाजपत्रकात केलेली साडेपाच कोटी रुपयांची तरतूद प्रभाग क्रमांक २३ डमध्ये वळवण्याचा ठराव स्थायी समितीने मंजूर केला आहे. या निर्णयाला भाजपच्या नगरसेवकांपाठोपाठ काँग्रेसचे नगरसेवक रफिक शेख यांनीही विरोध दर्शविला आहे. संबंधित नगरसेवकांना विश्वासात न घेता निधीचे वर्गीकरण केल्याचा आरोप करत शेख यांनी आयुक्तांकडे हा ठराव रद्द करण्याची मागणी केली आहे.
याशिवाय बंडगार्डन परिसरातील दोन विकासकामांसाठी राखून ठेवलेला साडेपाच कोटी रुपयांचा निधी तळजाई परिसरातील रस्त्यांसाठी वळवल्याचा मुद्दाही चर्चेत आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी काढलेल्या नव्या परिपत्रकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सर्व खातेप्रमुख, महापालिका सहाय्यक आयुक्त आणि विभागप्रमुखांना आदेशाची माहिती देऊन त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे.