पुणे: येरवडा-कळस-धानोरीसह हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत असणारी अतिक्रमणे आणि अनधिकृत व्यावसायिकांवर पुणे महापालिकेच्या अतिक्रमण व बांधकाम विभागाने गुरुवारी मोठी कारवाई केली. या वेळी गैरप्रकार टाळण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. जेसीबीच्या साह्याने बांधकामांचे शेड पाडण्यात आले तसेच काही विक्रेत्यांचे साहित्य जप्त केले. अशा कारवाया सुरूच राहणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संदीप खलाटे यांनी दिली.
येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील म्हस्केवस्ती ते फुलेनगर आणि विश्रांतवाडी ते फाईव्ह नाईन चौकातील रस्ते पदपथावरील तसेच फ्रंट व साइड मार्जिनमध्ये अनेकांनी अतिक्रमण केले होते. यामुळे काही मार्गांवर वाहतूक कोंडी होत होती, तर ये-जा करणार्यांना देखील अतिक्रमणांचा त्रास होत होता. त्यामुळे ही अतिक्रमणे काढावी, अशी मागणी स्थानिकांनी केली होती. (Latest Pune News)
आयुक्त नवलकिशोर राम यांनी देखील कारवाईचे आदेश दिले होते. उपायुक्त संदीप खलाटे, परिमंडल 1 चे उपायुक्त माधव जगताप व सहायक आयुक्त अशोक भंवरी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईत 18 बिगारी सेवक, 3 ट्रक आणि एका जेसीबीच्या साह्याने अतिक्रमणे काढण्यात आली. तब्बल 4000 स्क्वेअर फुटांवरील कच्चे आणि पक्के शेड पाडले. तर 1 हातगाडी, 3 काउंटर, 6 पथारी, खुर्च्या, 1 स्टॉल व आदी साहित्यही जप्त केले.
हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालय हद्दीत देखील गेल्या चार दिवसांपासून अतिक्रमण निर्मूलन कारवाई सुरू आहे. प्रामुख्याने सोलापूर रोड, सासवड रोड, काळेपडळ, चिंतामणीनगर, महंमदवाडी, हांडेवाडी इत्यादी ठिकाणी अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे 5 जवान, 2 पोलिस कर्मचारी, मध्यवर्ती (भरारी) पथक व हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाकडील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण निरीक्षक राकेश काची, सहायक निरीक्षक कुणाल मुंढे, साईनाथ निकम, अभिलाष कांबळे, वामन सुद्रिक, माधव बहिरम तसेच मध्यवर्ती पथकातील सहायक निरीक्षक सौरभ सरोदे, निशांत सावंत, तुषार कदम आदींनी ही कारवाई केली. या कारवाईत 18 हातगाड्या, 110 पथारी, 39 शेड, 1 स्टॉल, 2 काउंटर व 3 सिलिंडर जप्त केले.
शहरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच ठेवण्यात येणार आहे. याबाबत आयुक्त नवलकिशोर राम यांनी आदेश दिले आहेत. नागरिकांच्या तक्रारीनुसार शहरातील विविध भागांत ही कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी, व्यावसायिकांनी कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम, व्यवसाय करू नयेत.- संदीप खलाटे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग