पुणे: महापालिकेच्या शाळांमधील शैक्षणिक वर्ष संपण्यास अवघे काही महिने शिल्लक असताना प्रशासनाने साडेचार कोटी रुपयांची पूरक आणि व्यवसाय पुस्तके विनानिविदा खरेदी करण्याचा घाट घातल्याचे समोर आले आहे. विशिष्ट प्रकाशकाला लाभ देण्यासाठी हा प्रस्ताव आणला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी हा प्रस्ताव मागील स्थायी समितीच्या बैठकीत मांडला होता. या प्रस्तावावर अंतिम निर्णय शुक्रवारी स्थायी समितीत होणार आहे. (Latest Pune News)
महापालिकेच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, गणित, इंग््राजी, बुद्धिमत्ता व संगणक या विषयांच्या लेखन सरावासाठी व्यवसाय पुस्तके खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शालेय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून पालकांच्या खात्यात थेट अनुदान जमा केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर साहित्य मिळते आणि प्रशासनावर पारदर्शकतेचा शिक्का बसतो. मात्र आता वर्षाच्या शेवटी ही पुस्तके खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याने गैरव्यवहाराचा संशय निर्माण झाला आहे.
शैक्षणिक वर्ष संपत आलेले असताना आणि सहामाही परीक्षा देखील पूर्ण झाल्या असताना, लेखन सराव पुस्तके देऊन नेमका कोणता शैक्षणिक लाभ होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काही मुख्याध्यापकांच्या समितीने विशिष्ट प्रकाशकांच्या पुस्तकांची निवड केली असून, त्यावर 15 ते 20 टक्के डिस्काउंट देण्याची ऑफर देण्यात आली आहे. हीच पुस्तके बाजारात सहज उपलब्ध असून, त्यावर मोठा सवलत दर मिळतो. त्यामुळे ही खरेदी विद्यार्थ्यांच्या नव्हे तर प्रकाशकांच्या फायद्यासाठी केली जात असल्याचा आरोप होत आहे.
विद्यार्थ्यांना पुस्तके द्यायची असतील तर निविदा काढूनच खरेदी केली पाहिजे. विनानिविदा पुस्तके खरेदी करणे हे नियमबाह्य आणि बेकायदेशीर आहे.विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजन नागरिक मंच