पुणे: महापालिकेत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादाचा चेंडू आता थेट मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात पोहोचला आहे. महापालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना मित्रपक्षाकडून अन्यायकारक वागणूक मिळत असून, या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी थेट उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कामाच्या चौकशीची मागणी केल्याने महापालिकेतील सत्ताधारी भाजप व विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वादविवाद सुरू झाला. त्यातच भाजपने थेट राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांचा निधी शून्य करीत राष्ट्रवादीची कोंडी केली.
तसेच, सभागृहनेते गणेश बिडकर यांनी थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवून या नगरसेवकांची तक्रार केली होती. त्यामुळे हा वाद अधिकच पेटला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीने थेट मुख्यमंत्र्यांनाच या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी साकडे घातले आहे. याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष टिंगरे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात एखाद्या व्यक्तीशी असलेल्या राजकीय मतभेदांचा परिणाम संपूर्ण पक्षाच्या नगरसेवकांवर आणि नागरिकांच्या विकासकामांवर होऊ नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
तसेच, महायुतीच्या भावनेतून महापौर-उपमहापौर निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला सहकार्य केले. त्या वेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना निधी आणि विविध विषय समित्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, स्थायी समितीच्या अंदाजपत्रकातील निधी वाटपात अपेक्षित न्याय मिळाला नाही. तसेच, क्षेत्रीय कार्यालयांची रचना करताना राष्ट्रवादीला एकही प्रभाग समिती अध्यक्षपद मिळणार नाही, अशी रचना केली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही याबाबत मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे तक्रार केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या; मात्र अद्याप अपेक्षित तोडगा निघालेला नसल्याचे टिंगरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले आहे. महापालिकेतील या परिस्थितीत आपण वैयक्तिक लक्ष घालून स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांच्या विकासकामांसाठी समान आणि न्याय्य संधी मिळेल, याबाबत आवश्यक त्या सूचना द्याव्यात, अशी विनंती टिंगरे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
नेत्यांवरील टीकेचे समर्थन नाही
महायुतीतील वरिष्ठ नेत्यांबाबत करण्यात आलेल्या कोणत्याही टीकाटिप्पणीचे आम्ही समर्थन केलेले नाही आणि करणार नाही, असेही टिंगरे यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. याबाबत आमच्या वरिष्ठ नेत्यांनी योग्य ती दखल घेतली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.