

पुणे: राज्याच्या कृषी विभागाने प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात सोमवारी (दि. 24) काळ्या फिती लावून काम केले. हा आकृतिबंध शेतकरीहितास आणि कृषी विभागातील तांत्रिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हितासही बाधक असल्याचा आरोप करीत तो रद्द करावा आणि तज्ज्ञ समिती गठित करून नव्याने आकृतिबंध करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघासह विविध कृषी अधिकारी- कर्मचारी संघटनांनी केली आहे.
तशी निवेदने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येत असून, मागण्या मान्य न झाल्यास टप्प्याटप्प्याने आंदोलन वाढवत शुक्रवार (दि. ४ सप्टेंबर) पासून बेमुदत ‘काम बंद’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
प्रस्तावित आकृतिबंधामध्ये कृषी विभागातील शेतकऱ्यांसोबत काम करणाऱ्या तांत्रिक संवर्गात बदल करून अनावश्यक संवर्ग रद्द करणे व काही संवर्गात बदल करून क्षेत्रीय यंत्रणा सक्षम करणे अपेक्षित होते. परंतु, शेतकरी अथवा त्यांच्यासोबत काम करणारे कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दुर्लक्षित करून ज्यांचा शेतीशी कोणताही संबंध नाही, अशा लोकांद्वारे शेती क्षेत्राला मारक असा आकृतिबंध तयार केला असल्याने तो तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
प्रस्तावित आकृतिबंधातील त्रुटी
शेतकरीकेंद्रित दृष्टिकोनाचा अभाव, शेतकऱ्यांच्या बदलत्या गरजा व तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष, तांत्रिक संवर्गात शेतकरीहिताचे बदल नाहीत, भविष्यातील कृषी क्षेत्राचा पुरेसा वेध नाही, क्षेत्रीय यंत्रणा बळकटी करण्याचा अभाव, प्रयोगशील शेतकरी, तज्ज्ञांचा व तांत्रिक संवर्गाचा सहभाग नाही, जुन्या आकृतिबंधाच्या मर्यादा कायम राहण्याची शक्यता असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे. त्यासाठी तज्ज्ञ समिती नेमून त्यामध्ये जुन्या समितीतील व्यक्तींचा नव्या समितीत समावेश करू नये, अशीही मागणी त्यांनी केली आहे.