पुणे: छोट्या, पण रोजच्या प्रश्नांमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करत शहरात शिस्त, स्वच्छता आणि दर्जेदार रस्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने पुणे महापालिकेने ‘शहर परिवर्तन कक्ष’ची स्थापना केली आहे. आयुक्त नवल किशोर राम व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत या कक्षाची पहिली बैठक गुरुवारी पार पडली असून, दर महिन्याला आढावा घेऊन 2026 अखेरीपर्यंत पुण्याचा कायापालट करण्याचा आराखडा निश्चित करण्यात आला. या माध्यमातून शहरात लक्षणीय बदल घडवून आणण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे. या कक्षाच्या कामकाजाचा दर महिन्याला आढावा घेतला जाणार आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्यासह महापालिका, एमएसडीसीएल, पोलिस, बीएसएनएल आदी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत शहरातील दैनंदिन आणि छोटे, पण महत्त्वाचे प्रश्न, रस्त्यांवरील खोदकाम, स्वच्छता, पादचारी मार्गांची अवस्था, तसेच विभागांतील समन्वयाचा अभाव या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, 2026 या वर्षात महापालिकेने छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठे परिवर्तन घडवण्याचा संकल्प केला आहे. पुणे ग््राँड टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या निमित्ताने विविध शासकीय विभागांनी एकत्रितपणे काम करून शहरात सकारात्मक बदल घडवून आणला. हाच समन्वय पुढील एक वर्ष कायम ठेवत शहराच्या विकासकामांना गती दिली जाणार आहे. यासाठीच ‘शहर परिवर्तन कक्ष’ची स्थापना केली.
या कक्षाच्या माध्यमातून महापालिकेला अन्य विभागांकडून अपेक्षित असलेले सहकार्य आणि इतर विभागांना येणाऱ्या अडचणी यावर दर महिन्याला चर्चा केली जाईल. त्यातून निर्णय घेऊन कामांची अंमलबजावणी करण्यात येईल, असे आयुक्त राम यांनी स्पष्ट केले.
पुणे ग््राँड टूर सायकल स्पर्धेसाठी शहरातील सुमारे 75 किलोमीटर लांबीचे रस्ते व पादचारी मार्ग दुरुस्त केले. हे रस्ते पुढील पाच वर्षे खोदले जाणार नाहीत. याशिवाय येत्या वर्षभरात सायकल मार्गाच्या दुसऱ्या बाजूचे डांबरीकरण व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. सुमारे अडीच ते तीन लाख विद्युत खांब स्थलांतरित करण्यात येणार असून, हे काम ‘शहर परिवर्तन कक्षा’च्या माध्यमातून केले जाणार आहे.
30 पैकी 12 ‘मिसिंग लिंक’चे काम पूर्ण करण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद
या वर्षी समाविष्ट प्रत्येक गावातील किमान एक मुख्य रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल. तसेच 30 पैकी 12 ‘मिसिंग लिंक’चे काम पूर्ण करण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे, असे राम यांनी स्पष्ट केले.
शहरात मोठे प्रकल्प सुरूच राहतील, पण दैनंदिन देखभाल-दुरुस्ती आणि छोटे प्रश्न नियमीत व व्यवस्थित सुटले पाहिजेत. त्यासाठी विविध विभागांमधील समन्वय आवश्यक आहे. 2026 च्या अखेरीपर्यंत पुण्यात सकारात्मक बदल दिसतील.नवलकिशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका
पुणे ग््राँड टूर सायकल स्पर्धेच्या निमित्ताने शासकीय यंत्रणांची क्षमता दिसून आली. सध्या 75 किलोमीटरचे रस्ते सुधारले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या 900 किलोमीटरच्या स्पर्धेसाठी आणखी रस्त्यांचे काम केले जाईल. दर महिन्याला या कामांचा आढावा घेतला जाईल.जितेंद्र डूडी, जिल्हाधिकारी