

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर प्रथमच होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत बारामती तालुक्यात यंदा वेगळेच चित्र पाहायला मिळाले. हायटेक प्रचार, भव्य सभा, रॅली किंवा शक्तिप्रदर्शन न होता संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली. तब्बल 9 वर्षांनंतर निवडणूक होऊनही दुःखद घटनेमुळे तालुक्यातील निवडणूक वातावरणच बदलून गेले आहे.
राष्ट्रवादी काँग््रेासने मागील काळातील विकासकामांचा आढावा मांडत ‘कामाच्या जोरावर’ मतदारांकडे साद घातली, तर भाजप, शिवसेना व अपक्ष उमेदवारांनी आगामी विकासासाठी एक संधी देण्याचे आवाहन मतदारांना केले. सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी घरोघरी जाऊन थेट मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला. वैयक्तिक गाठीभेटी, मतदारांच्या समस्या समजून घेणे आणि पत्रकेवाटप यावरच भर देण्यात आला.
तालुक्यात एकाही मोठ्या नेत्याची जाहीर सभा झाली नाही. मोठ्या रॅली, प्रचार फेऱ्या किंवा शक्तिप्रदर्शन पूर्णतः टाळण्यात आले. त्यामुळे प्रचाराचा सूर सौम्य आणि व्यक्तिगत पातळीवर मर्यादित राहिला. काही ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग््रेासच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहेत.
अपक्ष उमेदवारांमुळे काही मतदारसंघांत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक अपक्षांनी निवडणूक रिंगणातून माघार घेत पाठिंब्याची पत्रे राष्ट्रवादीला सादर केली आहेत. यंदा अजित पवार यांच्याशिवाय पार पडणारी निवडणूक बारामतीतील मतदारांसाठी खूपच वेगळी आहे.
बारामती तालुक्यातील ही निवडणूक कोणत्याही गदारोळाविना, शांततेत आणि थेट मतदारसंवादाच्या माध्यमातून पार पडत असून, मतदार आपला कौल कोणाच्या पारड्यात टाकतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.