पुणे: नवनिर्वाचित नगरसेवकांचा समावेश असलेले महापालिकेचे सभागृह लवकरच अस्तित्वात येणार असून, महापालिकेच्या 2026-27 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक येत्या 30 जानेवारीपर्यंत सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. आगामी अंदाजपत्रकात रस्त्यांची दुरुस्ती व नवीन रस्त्यांचा विकास, स्वच्छता आणि पाणीपुरवठा या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.
महापालिकेचे अंदाजपत्रक सर्वप्रथम आयुक्तांकडून तयार करण्यात येते. यामध्ये मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबरअखेरपर्यंतचे प्रत्यक्ष उत्पन्न, पुढील तीन महिन्यांत म्हणजे मार्चअखेरपर्यंत अपेक्षित उत्पन्न, तसेच शासनाकडून मिळणारा निधी यांचा समावेश असतो. नियमानुसार साधारणतः 20 जानेवारीपूर्वी आयुक्तांनी अंदाजपत्रक सादर करणे अपेक्षित असते. त्यानंतर स्थायी समितीकडे हे अंदाजपत्रक सादर करण्यात येते आणि स्थायी समिती अंतिम निर्णय घेऊन ते सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी सादर करते. मात्र, यंदा 15 डिसेंबरपासून सुरू झालेल्या निवडणूक प्रक्रियेमुळे तसेच त्यापूर्वी प्रभाग रचना आणि मतदार याद्यांच्या कामामुळे अंदाजपत्रक विहीत मुदतीत सादर करणे शक्य झाले नाही.
यासंदर्भात आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, निवडणुकीमुळे अंदाजपत्रकाला अंतिम स्वरूप देता आले नाही. मात्र, येत्या 30 जानेवारीपर्यंत अंदाजपत्रक सादर केले जाईल. सायकल स्पर्धेच्या निमित्ताने शहरातील काही रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली असून, सुमारे दोन हजार चेंबर्स समपातळीत करण्यात आले आहेत.
पुढील वर्षभरात शहरातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच सुमारे 40 हजार चेंबर्स समपातळीत करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. काही ठिकाणी पावसाळी गटारांचे चेंबर्स समपातळीत करण्याला प्राधान्य दिले जाईल. शहर स्वच्छ ठेवणे आणि सर्व कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प कार्यान्वित करणे, हेही प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.
अनुदानाचाही अंदाजपत्रकात समावेश असणार
महापालिकेचे आगामी अंदाजपत्रक सुमारे 1 हजार 500 कोटी रुपयांचे असण्याची शक्यता असून, शासनाकडून समाविष्ट गावांसाठी मिळणारा सुमारे 2 हजार कोटी रुपयांचा जीएसटी, मुद्रांक शुल्क अधिभार तसेच विविध योजनांमधील अनुदानाचाही या अंदाजपत्रकात समावेश असणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.