प्रसाद जगताप
पुणे : गेली सहा ते सात वर्षांपासून पुणे-मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (एक्सप्रेस वे) वर्षाला 50 पेक्षा अधिक वाहनचालकांचे अपघाती मृत्यू होत आहेत. एक्सप्रेस वे वरच विविध ठिकाणी हे अपघात होत असून, ते रोखण्यासाठी असलेल्या महामार्ग पोलिसांसह संबंधित अन्य यंत्रणांच्या कामकाजावर आता प्रश्नचिन्ह उभे राहायला सुरूवात झाली आहे. दरवर्षी 50 पेक्षा अधिक जणांचा अपघाती मृत्यू होत असल्याने वाहनचालक आणि वाहतूक अभ्यासकांनी नाराजी व्यक्त केली आहे.(Latest Pune News)
महामार्ग पोलिसांनी नुकत्याच जाहीर केलेल्या पुणे-मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे) अपघातांच्या आकडेवारीने प्रवासी आणि वाहनचालकांचे याकडे लक्ष वेधले आहे. हा मार्ग अधिक सुरक्षित होण्याऐवजी, जीवघेण्या आणि गंभीर अपघातांसाठीची त्याची ओळख आता कायम ठेवताना दिसत आहे. सन 2019 आणि 2022 मध्ये प्रत्येकी 92 जणांना या महामार्गावर जीव गमवावा लागला, तर 2024 मध्ये ही संख्या 90 होती. सन 2023 हे वर्ष तुलनेने दिलासादायक ठरले होते, जेव्हा एकूण अपघातातील बळींची संख्या 65 पर्यंतखाली आली होती. जानेवारी ते सप्टेंबर 2025 या नऊ महिन्यांच्या आकडेवारीत 51 जणांचा अपघाती मृत्यू झाला असून, उर्वरीत महिन्यांची आकडेवारी चालू वर्षाअखेरीस समोर येईल, त्यावेळी सन 2025 मधील एकूण अपघाती मृत्यूंचे प्रमाणसमोर येणार आहे.
पुणे-मुंबई महामार्गावर असलेल्या घाट रस्त्यांवर विकेंड असो किंवा सण असो, प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीमुळे पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरून वाहनचालकांचा प्रवास सोपा होण्याऐवजी आणखी अवघड व मानसिक त्रास देणारा होत आहे. महामार्ग पोलिसांसह संबंधित यंत्रणांकडून याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.
सातत्याने होत असलेले जीवघेणे अपघात सिद्ध करतात की, फक्त दंड आकारून किंवा गस्त वाढवून प्रश्न सुटणार नाही. तांत्रिक उपाययोजना, ब्लॅक स्पॉट कमी करणे, घाट विभागात अधिक कठोर नियम लागू करणे आणि विशेषत: लेन कटिंग करणाऱ्यांवर व वेगमर्यादा ओलांडणाऱ्यांवर मनुष्यबळामार्फत तत्काळ कारवाई करणे आवश्यक आहे. महामार्ग पोलिसांकडूनही याबाबत कारवाई होत असते. मात्र, त्याबाबत ठोस उपाय निघतील, असे नियोजन करावे, अशी मागणी वाहतूक अभ्यासकांकडून केली जात आहे.
पुणे-मुंबई-एक्सप्रेस वे वर दरवर्षी 50 जणांचा अपघाती मृत्यू होणे, हे खूपच चिंताजनक आहे. ते रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आता अलर्ट मोडवर येणे, गरजेचे आहे. माझ्या मते सर्वप्रथम या मार्गाचे सेफ्टी ऑडीट करावे. यात ब्लॅकस्पॉट वर विशेष लक्ष देऊन ते घालवण्यासाठी कामे करावीत. तसेच, मार्गावर धावणाऱ्या वाहनांचा वेग हेच अपघाताचे मुख्य कारण असते, तो वेग कमी करण्यासाठी नुसती स्पीड गन लावणे, चलन करणारे कॅमेरे लावणे, या उपाययोजनांमुळे वाहनांचा वेग कमी होणार नाही. परिणामी, अपघात हे होतच राहणार आहेत. जर वाहनांचा वेग नियंत्रित करायचा असेल, तर रस्त्याच्या डिझाईनमध्येच बदल करून वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. याशिवाय महामार्ग पोलिस आणि अन्य सबंधित यंत्रणांनी एकत्र येत, संयुक्त बैठका घेत पुणे-मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील अपघात आणि अपघाती मृत्यू शून्य बनविण्याचे टार्गेट अचिव्ह केले पाहिजे.प्रांजली देशपांडे-आगाशे, वाहतूक अभ्यासक
मला कामानिमित्त सातत्याने पुणे-मुंबई-पुणे प्रवास करावा लागतो. यावेळी अनेक वाहनचालक मोठ्या प्रमाणात वेगाने वाहने चालवताना दिसतात. यात महत्त्वाचे म्हणजे अवजड वाहनचालक, सार्वजनिक आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस गाड्यांकडून सातत्याने लेन शिस्तीची ऐशी तैशी होत आहे. त्याचबरोबर या महामार्गावर ठिकठिकाणी पोलिस दिसायला हवेत. मात्र, बहुतांश वेळा पोलिसच दिसत नाहीत. विकेंडला तर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागतो.नितीन इंगुळकर, वाहनचालक