Pune Municipal Corporation Pudhari
पुणे

Pune Water Supply: महंमदवाडीत नव्या पाण्याच्या टाक्यांमुळे पाणीपुरवठा सुरू होणार; नळजोडणी शुल्कावर महापालिकेचा इशारा

नागरिकांनी अधिकृत दरानेच नळजोडणी करून घ्यावी; अवाजवी रक्कम उकळणाऱ्यांविरोधात तक्रारीचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महंमदवाडी परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यांमधून लवकरच नियमित पाणीपुरवठा सुरू होणार आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर नळजोडणी करून देण्याच्या नावाखाली काही ठिकाणी नागरिकांकडून अवाजवी रक्कम उकळली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेने निश्चित केलेल्या दरानुसारच शुल्क भरावे आणि अधिकृत परवानाधारक प्लंबरकडूनच नळजोडणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

महंमदवाडी परिसरातील वाढती लोकसंख्या आणि पाणीपुरवठ्याची वाढती गरज लक्षात घेऊन महापालिकेने दोराबजी पॅराडाईज परिसरात तीन नवीन पाण्याच्या टाक्यांची उभारणी केली आहे. या नव्या टाक्यांमधून 1200 ते 1500 गृहनिर्माण सोसायट्या आणि इमारतींना नियमित व अधिक दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून भेडसावत असलेला कमी दाबाने पाणी मिळण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

सध्या या परिसराला रामटेकडी आणि बकरी हिल येथील टाक्यांमधून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, जलवाहिन्यांच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सोसायट्यांना अत्यल्प दाबाने पाणी मिळत होते. नव्या टाक्यांमुळे मुख्य जलवाहिन्यांचे जाळे मजबूत करण्यात आले असून, पाणीपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत होणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

दरम्यान, नळजोडणीसाठी काही नागरिकांकडून तब्बल 50 हजार रुपयांपर्यंत रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. महापालिकेने या प्रकारांना गंभीरतेने घेतले असून, अवाजवी शुल्क आकारणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर मागण्या मान्य करू नयेत तसेच अशा प्रकारांची तातडीने तक्रार करावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.

महापालिकेने अधिकृत परवानाधारक प्लंबरची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली असून, नागरिकांनी केवळ अधिकृत प्लंबरमार्फतच नळजोडणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, यापूर्वीच नियमित नळजोडणी असलेल्या सोसायट्यांना नव्याने जोडणी घेण्याची आवश्यकता नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिकृत परवानाधारक प्लंबरची यादी संकेतस्थळावर

महापालिकेने तब्बल 575 अधिकृत परवानाधारक प्लंबरची यादी पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे. नागरिकांनी त्यामधील अधिकृत प्लंबरशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिकृत प्लंबरकडूनही अवाजवी रकमेची मागणी करण्यात आल्यास कार्यकारी अभियंता, लष्कर पाणीपुरवठा विभाग, सेंट बिशप हायस्कूलजवळ, जनरल भगत मार्ग, पुणे येथे लेखी तक्रार करावी, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.

नळजोडणीसाठी महापालिकेने निश्चित केलेले शुल्क

  • 1/2 इंच 12 पर्यंत: 1,475 3,104

  • 3/4 इंच 24 पर्यंत: 2,946 6,049

  • 1 इंच 48 पर्यंत: 7,757 14,272

  • ग्1 ते 2 इंच 192 पर्यंत: 19,339 62,053

  • ग्2 ते 3 इंच 484 पर्यंत: 29,477 80,667

  • 3 इंचापुढे 384 पर्यंत: 30,810 1,19,452

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT