Road Repair Pudhari
पुणे

Pune Road Repair: पुण्यात रस्तादुरुस्तीचा दर्जा ४८ तासांत उघड; मॉडेल कॉलनीतील डांबर उखडले

पाइपलाइन गळतीची माहिती असतानाही डांबरीकरणाची घाई? करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी थांबवण्याची नागरिकांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील प्रमुख आणि उच्चभ्रू भागांपैकी एक असलेल्या मॉडेल कॉलनीत महापालिकेच्या रस्तादुरुस्तीच्या कामाचा दर्जा अवघ्या ४८ तासांत उघड झाला आहे. बी. एम. थोरात चौकाजवळ पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी खोदलेल्या रस्त्याचे दोन दिवसांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, अवघ्या दोन दिवसांतच डांबराचा थर उखडल्याने रस्त्यावर पुन्हा खडी आली आहे. विशेष म्हणजे, सध्या पावसाचीही विश्रांती असल्याने रस्ता उखडण्यामागे नेमके कारण काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

पाइपलाइनचे काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेला भाग बुजवून संबंधित ठेकेदाराने डांबरीकरण केले. त्यामुळे रस्ता पूर्ववत झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, वाहनांची वर्दळ सुरू होताच डांबराचा थर उखडू लागला. काही तासांतच रस्त्यावर खडी आणि डांबराचे तुकडे विखुरले. त्यामुळे वापरलेले साहित्य आणि दुरुस्तीची पद्धत, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी नेमकी पाहणी केली होती का? असा सवालही नागरिकांनी केला आहे.

पाइपलाइनला गळतीची माहिती असतानाही डांबरीकरणाची घाई का?

पाइपलाइनला गळती असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. गळती दुरुस्त केल्यानंतर रस्ता पुन्हा दुरुस्त केला जाणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मग गळती दुरुस्त होण्यापूर्वीच डांबरीकरण करण्याची घाई का करण्यात आली? रस्ता पूर्ववत केल्याचा केवळ देखावा करण्यामागे कोणाची भूमिका होती? याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी कधी थांबणार?

दोन दिवसांतच रस्ता उखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. निकृष्ट कामाची जबाबदारी कोणाची? ठेकेदारावर कारवाई होणार का? आणि बिल देण्यापूर्वी गुणवत्ता तपासली जाणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. करदात्यांच्या पैशांतून रस्ते वारंवार दुरुस्त करायचे आणि काही दिवसांतच ते पुन्हा उखडायचे, हा प्रकार किती काळ सुरू राहणार? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.

पाऊस नाही; मग रस्ता उखडला कसा?

पावसाळ्यात रस्ते खराब झाल्यास पावसाचे कारण पुढे केले जाते. मात्र, सध्या पावसाची विश्रांती असतानाही अवघ्या ४८ तासांत डांबर उखडल्याने वापरण्यात आलेले साहित्य, डांबरीकरणाची पद्धत आणि कामाची गुणवत्ता, यांची तपासणी करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT