Pune Minor Student Bike Riding Pudhari
पुणे

Pune Minor Student Bike Riding Action: पुण्यात अल्पवयीन विद्यार्थ्यांची दुचाकी स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल होताच पोलिस-आरटीओची कारवाई

वडगाव खुर्दच्या सणस शाळेला नोटीस; पालकांचे समुपदेशन, वाहतूक नियम तोडणाऱ्या विद्यार्थ्यांवर ६ हजारांचा दंड

पुढारी वृत्तसेवा

पुणे: वडगाव खुर्द येथील सणस शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून दुचाकी चालवल्याचा व्हिडीओ शुक्रवारी (दि.१७) सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओची गंभीर दखल घेत नांदेड सिटी पोलीस आणि पुणे आरटीओने मोठी कारवाई केली.

वडगाव खुर्द आणि धायरी भागात अल्पवयीन मुलांकडून सातत्याने वाहतूक नियमांची ''ऐशी तैशी'' केली जात आहे. काही दिवसांपूर्वी वारजे भागातही एकाच दुचाकीवर चार अल्पवयीन मुले बसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, तेव्हा वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी पालकांना बोलावून त्यांचे समुपदेशन केले होते.

मात्र, तरीही पुन्हा एकदा याच भागातील वडगाव खुर्द येथील सणस शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून दुचाकी चालवत वाहतूक नियमांची ऐशी तैशी करत शाळेत जातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या भागातील असे प्रकार थांबत नसल्याने आता प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पालकांनी आता अल्पवयीन मुलांना वाहनांपासून दूर ठेवावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुणे आरटीओने वडगाव खुर्द येथील शाळेला नोटीस बजावली आहे. यासाठी एका स्वतंत्र वायू पथकाची नेमणूक करण्यात आली असून, हे पथक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे समुपदेशन करेल. तसेच आगामी काळात वडगाव-धायरी भागात अल्पवयीन चालकांविरुद्ध विशेष मोहीम राबवून कडक कारवाई केली जाईल.
स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
पोलिसांनी शाळेला भेट दिली असून, आम्ही संबंधित व्हिडीओतील विद्यार्थी आणि त्याच्या पालकांना बोलावून कडक सूचना दिल्या आहेत. शाळेच्या गेटच्या आत गाडी आणण्यास आधीपासूनच बंदी आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी घरी न सांगता गुपचूप गाडी आणल्याचे समोर आले आहे. यापुढे अधिक काळजी घेतली जाईल.
वर्षा खोमणे, मुख्याध्यापिका, सणस शाळा
व्हिडीओ समोर येताच आम्ही तातडीने सणस शाळेत मार्शल पाठवून संबंधित दुचाकी जप्त केली. या अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे समुपदेशन केले व कडक नोटीस बजावली. संबंधित गाडीवर विरुद्ध दिशेने वाहन चालवणे (रॉंग साईड), विनापरवाना वाहन चालवणे (विदाऊट लायसन्स) आणि फॅन्सी नंबरप्लेट असणे याअंतर्गत ६ हजार रुपयांचा ऑनलाईन दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच मुख्याध्यापकांनाही यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.
अतुल बोस, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नांदेड सिटी पोलीस स्टेशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT