पुणे : अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य व लैंगिक चाळे करणार्याला विजय महादेव गावडे (वय 31, रा. फिरस्ता, मूळ. बेटवडे, ता. दौंड) यास न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी हा निकाल दिला. दंडाची रक्कम पीडित मुलाला देण्यात यावी, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. याबाबत पीडित 17 वर्षीय मुलाने बंडगार्डन पोलिसात फिर्याद दिली होती. (Pune News )
ही घटना 25 मार्च 2017 रोजी घडली होती. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली होती. पीडित पुणे रेल्वे स्टेशन येथे अंडा भुर्जीच्या गाडीवर पाणी भरायचे काम करायचा. तर गावडे हाही या परिसरात अंडा भुर्जीची गाडी चालवत होता. ‘अंघोळ करायला जाऊ’ म्हणून तो पीडित मुलाला एस.टी.स्टॅण्डच्या सुलभ शौचालयात घेऊन गेला. तिथे त्याच्यावर तीनवेळा अनैसर्गिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी सात साक्षीदार तपासले. यामध्ये पीडित मुलगा व वैद्यकीय अधिकार्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सतिश पवार यांनी या प्रकरणाचा तपास केला. तर न्यायालयीन कामकाजासाठी सहायक पोलीस फौजदार गोपिका ओव्हाळ यांनी मदत केली.