

Pune Katraj Accident News
पुणे : पुण्यात रस्ते अपघाताचे सत्र सुरू असून कात्रजमधील सुखसागर नगर येथे भरधाव कारने पदपथावरून जाणाऱ्या तरुणीला धडक दिल्याची घटना शुक्रवारी घडली. गाडीचा वेग ऐवढा जास्त होता की कार आणि पदपथावरील झाड याच्यामध्ये अडकून श्रेया येवले ( वय 21) या तरुणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले आहे.
सुखसागर नगर येथील सोसायटीच्या समोर शुक्रवारी दुपारी भीषण अपघात झाला. श्रेया येवले ही तरुणी नारळाचे झाड तोडून पदपथावरून जात होती. यादरम्यान भरधाव कार पदपथावर घुसली आणि श्रेयाला धडक दिली. पदपथावरील बदामाचे झाड आणि कार यात अडकून श्रेयाचा मृत्यू झाला. श्रेया ही कोंढवामधील शीतल हाईट्स येथे राहत होती. अपघातानंतर बिबवेवाडी, भारती विद्यापीठ आणि कोंढवा पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी कारचालक सतीश होनमाने (वय 37, गोकुळनगर) याला ताब्यात घेतले असून शीतलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात रस्त्यांवर अपघातांचे सत्र सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी गंगाधाम येथे टँकरने दुचाकीला धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर 31 मे रोजी भरधाव कारने सदाशिव पेठेत एमपीएससीच्या 11 विद्यार्थ्यांना उडवले होते. यात विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते.