Milk Adulteration Pudhari
पुणे

Pune Milk Adulteration: पुणे जिल्ह्यात दूधभेसळीविरोधात मोठी कारवाई; ३७ आरोपी निष्पन्न, २५ जणांना अटक

दुधात डिटर्जंट आणि ‘नॉनिलफेनॉल इथॉक्सिलेट’चा वापर; २६ अन्न आस्थापनांवर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दूधभेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. दुधामध्ये डिटर्जंट तसेच 'नॉनिलफेनॉल इथॉक्सिलेट' या रसायनाचा वापर होत असल्याचे तपासातून समोर आले आहे. मंचर सोनाई डेअरी येथून कारवाईला सुरुवात होत माळशिरस आणि इतर ठिकाणापर्यंत पोहचली आहे. या कारवाईत आत्तापर्यंत ३७ आरोपी निष्पन्न झाले असून, त्यापैकी २५ जणांना अटक करण्यात आली आहे.

भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांच्या पुरवठ्यापासून ते दूध संकलन, शीतकरण आणि प्रक्रिया डेअरीपर्यंतची संपूर्ण साखळी एफडीएकडून तपासली. मंचर येथील कारवाईदरम्यान दुधातील घटक वाढविण्यासाठी वापरले जाणारे व्हे पावडर, डिटर्जंट आणि मिश्रण स्थिर ठेवणारा पदार्थ यांसह विविध पदार्थ जप्त करण्यात आले. त्यानंतर आकाश डेअरी फार्म येथे घेतलेल्या सहा दूध नमुन्यांच्या तपासणीत सर्व नमुने 'डिटर्जंट आढळून आले.

भेसळ द्रव्यांचे पुरवठादार, वाहतूकदार, दूध संकलन केंद्रांशी संबंधित व्यक्ती, दूध शीतकरण केंद्रांशी संबंधित व्यक्ती, दुग्ध व्यावसायिक आदींचा त्‍यामध्ये समावेश आहे. तसेच, २६ अन्न आस्थापनांचे परवाने अथवा नोंदणी निलंबित किंवा व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासह इंदापूर, माळशिरस येथील संस्‍थांवरही कारवाई करण्यात आली. नवकार डिस्ट्रिब्यूटर्स (भोरामळा, अवसरी खुर्द, ता. आंबेगाव, आकाश डेअरी फार्म, मंचर), पिरसाई मिल्‍क अँड मिल्‍क पावडर. अथर्व मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट इंडस्ट्रीज (शिरवे, पारगाव, ता. आंबेगाव), सोनाई डेअरी (गोखळी, इंदापूर) आदीवर कारवाई करण्यात आली.

अन्न व औषध प्रशासनामार्फत राज्यातील दूध संकलन केंद्रे, दूध शीतकरण केंद्रे, डेअरी व दूध प्रक्रिया उद्योग, तसेच दूध भेसळीसाठी वापर होण्याची शक्यता असलेल्या पदार्थांच्या पुरवठा साखळीवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. भेसळीचा अंतिम नमुना पकडण्याबरोबरच भेसळीसाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांच्या मूळ पुरवठादारापासून अंतिम दूध पुरवठ्यापर्यंतची संपूर्ण साखळी शोधून संबंधित प्रत्येक जबाबदार व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे प्रशासनाचे धोरण आहे.

महाराष्ट्रात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत व कायद्याच्या अंमलबजावणीबाबत शासन अत्यंत कठोर आहे. ग्राहकांच्या आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. मुदतबाह्य किंवा फेरफार केलेल्या अथवा अस्वच्छ व असुरक्षित परिस्थितीत तयार केलेल्या अन्नपदार्थांची विक्री/साठवणूक करणाऱ्या आस्थापनांवर अशीच कठोर कायदेशीर कारवाई चालू राहील.
तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT