पुणे: महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाकडून (म्हाडा) वितरित करण्यात येणारी सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाने महिलेची एक लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, श्रीकृष्ण वसंतराव तौर ऊर्फ बाळाराजे पाटील (रा. अरणगाव, ता. परांडा, जि. धाराशिव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 37 वर्षीय महिला पिंपरी-चिंचवडमधील रहाटणी परिसरात राहायला आहेत. फिर्यादी महिला आणि तिच्या पतीची आरोपीशी ओळख झाली. आरोपीने महिला आणि तिच्या पतीला म्हाडात सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर आरोपीने तक्रारदार महिला आणि तिच्या पतीला कोंढवा भागातील एका इमारतीजवळ बोलावले. सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून एक लाख 20 हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर महिलेने सदनिकेबाबत विचारणा केली, तेव्हा आरोपीने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.