पुणे

पुणे : भुयारी मार्ग महिनाअखेरीस होणार पूर्ण

अमृता चौगुले

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : पुण्यातील मेट्रोच्या भुयारी मार्गाचे काम मेअखेर अथवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. वर्षभरात या भुयारी मार्गातून मेट्रो धावू लागेल. सहा किलोमीटरच्या या मार्गात मेट्रोला ये-जा करण्यासाठी दोन स्वतंत्र बोगदे खोदण्यात येत आहेत.

स्वारगेटहून पिंपरीला जाणारी मेट्रो पुण्यातून भुयारीमार्गे जाणार आहे. खडकी रेंजहिल्सपासून त्या मेट्रोचा प्रवास पुलावरून उन्नत मार्गाने सुरू होईल. कृषी महाविद्यालयाच्या मैदानापासून 30 ऑक्टोबर 2019 रोजी बोगदा खोदण्यास सुरुवात झाली होती. दुसर्‍या बाजूला स्वारगेट येथूनही बोगद्याचे काम हाती घेण्यात आले. जानेवारी 2022 मध्ये पहिला बोगद्याचे काम पूर्ण झाले. मंडईपासून बुधवार पेठ मेट्रो स्थानकादरम्यान दुसर्‍या बोगद्याच्या शेवटच्या टप्प्यातील 1.2 किमी अंतराच्या खोदकामाला जानेवारीत प्रारंभ झाला. खोदकाम करणारे टनेल बोअरींग मशिन (टीबीएम) बुधवार पेठेपर्यंत पोहोचण्यास सुमारे तीनशे मीटर अंतर बाकी आहे.

हा भुयारी मार्ग न्यायालयापासून मुठा नदीच्या पात्राखालून बुधवार पेठेकडे मार्गस्थ झाला आहे. या भुयारी मार्गात स्वारगेट, मंडई, बुधवार पेठ, न्यायालय आणि शिवाजीनगर अशी पाच स्थानके आहेत. शिवाजीनगर व न्यायालय स्थानकांची कामे 90 टक्के पूर्ण झाली. स्वारगेटचे साठ टक्के, बुधवार पेठ स्थानकाचे 40 टक्के आणि मंडई स्थानकाचे 30 टक्के काम पूर्ण झाले आहे.

खडकीतील काम पूर्ण झाल्यास पुढील वर्षाच्या प्रारंभी पिंपरीपासून न्यायालयापर्यंत मेट्रो पोहोचण्याची शक्यता आहे. स्वारगेटपासून कात्रजपर्यंतच्या भुयारी मार्गाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. तो साडेपाच किलोमीटरचा मेट्रो मार्ग पाच वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

भुयारी मार्गाचे काम मेअखेर पूर्ण करणार आहोत. शिवाजीनगर व न्यायालय येथील भुयारी मार्गाची कामे अंतिम टप्प्यात आहेत. भुयारी मार्गातील लोहमार्ग टाकण्याच्या कामाचे आदेश दिले आहेत. वर्षभरात ते काम पूर्ण होईल. पुढील मार्चपर्यंत भुयारी मार्गातील काही स्थानकांत मेट्रो धावू शकेल.
अतुल गाडगीळ, संचालक, महामेट्रो

मेट्रो मार्ग

  • पिंपरी ते स्वारगेट : 17.5 किमी
  • भुयारी मार्ग : 6 किमी
  • दोन बोगद्यांचे एकूण अंतर : 12 किमी
  • बोगद्याची उंची : 6.6 मीटर
  • मेट्रो स्थानके : 5
SCROLL FOR NEXT