पुणे : एका जोडप्याने परवानगी न घेता आणि मेट्रो कर्मचाऱ्यांचे न ऐकता, मेट्रो स्थानक परिसर आणि मेट्रो ट्रेनमध्ये जोरदार प्री-वेडिंग फोटोशूट केल्याचा प्रकार समोर आला आहे. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, यामुळे मेट्रो प्रशासनाने तीव संताप व्यक्त केला आहे.(Latest Pune News)
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने अनेक जोडपी हटके प्री-वेडिंग शूटसाठी वेगवेगळ्या जागा निवडत आहेत. याच नादात एका कपलने थेट पुणे मेट्रो स्टेशनवर आणि ट्रेनच्या आतमध्ये फोटोशूट करण्याचे ‘साहस’ केले.
या जोडप्याने फोटोशूट करण्यासाठी मेट्रो प्रशासनाची कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नव्हती. शूट सुरू असताना मेट्रो स्टेशनवरील कर्मचाऱ्यांनी त्यांना अनाउन्स करून थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, या जोडप्याने आणि त्यांच्या सोबतच्या फोटोग््रााफरने कर्मचाऱ्यांचे म्हणणे साफ धुडकावून लावले आणि आपले शूट सुरूच ठेवले.
या अनधिकृत शूटिंगचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचे लक्षात येताच पुणे मेट्रो प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली. ‘ज्या कपलने आणि त्यांच्या टीमने मेट्रोमध्ये अनधिकृतपणे शूटिंग केले आहे, त्यांच्यावर लवकरच नियमानुसार कडक कारवाई केली जाईल,’ अशी माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे.
लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे, परंतु परवानगीशिवाय सार्वजनिक मालमत्तेचा अशा प्रकारे वापर करणे जोडप्याला चांगलेच महागात पडले आहे. मेट्रो कायद्यानुसार त्यांच्यावर दंड आकारला जाऊ शकतो किंवा नियम मोडल्याबद्दल कायदेशीर कारवाई होऊ शकते.