Metro PMPML Pudhari
पुणे

Pune Metro PMPML Integration: पुणे मेट्रो-पीएमपी तिकीट इंटिग्रेशनला वेग; एकाच तिकिटावर प्रवास शक्य होणार

प्रवाशांसाठी मोठी सुविधा; मेट्रो आणि बस सेवा एकत्र येणार, वेळ व खर्चात बचत

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पीएमपी आणि पुणे मेट्रो यांच्यातील तिकीट इंटिग्रेशनचे (एकत्रित तिकीट प्रणाली) काम आता वेगाने सुरू झाले आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना एकाच तिकिटावर किंवा पासवर मेट्रो आणि पीएमपी बसने प्रवास करणे शक्य होणार आहे.

पीएमपी आणि मेट्रोच्या या प्रणालीला गती देण्यासाठी नुकतीच पीएमपीएमएल आणि या कामासाठी नियुक्त केलेल्या एका विशेष कंपनीची उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही वाहतूक यंत्रणा एकमेकांशी कशा प्रकारे जोडल्या जाऊ शकतात, यावर सविस्तर चर्चा झाली. तिकीट इंटिग्रेशनचे काम तांत्रिक व व्यावहारिकदृष्ट्या यशस्वी करण्यासाठी एका तज्ज्ञ कंपनीची नेमणूक केली आहे.

ही कंपनी संपूर्ण प्रणालीचा सखोल अभ्यास करेल. प्रवाशांच्या आणि पीएमपी, मेट्रोच्या सोयीनुसार सर्वोत्तम पर्याय शोधेल. त्याच्या अभ्यासाअंती आपला सविस्तर अहवाल पीएमपीएमएल प्रशासनाकडे सादर करेल. नियुक्त केलेली कंपनी सध्या या प्रकल्पाचा सखोल अभ्यास करत आहे. त्यांनी येत्या आठ दिवसांत अहवाल सादर केल्यानंतरच पुढील अंतिम कार्यवाही सुरू होणार आहे.

प्रवाशांना फायदा?

  • एकच तिकीट, दुहेरी प्रवास होणार आहे. मेट्रोतून उतरून पीएमपी बस पकडताना किंवा उलट प्रवास करताना वारंवार वेगवेगळ्या रांगेत उभे राहून तिकीट काढण्याची गरज पडणार नाही.

  • वेळेची आणि पैशांची बचत होणार आहे. तिकीट प्रणाली एकत्र आल्याने प्रवाशांचा वेळ वाचेल आणि प्रवास अधिक गतिमान होईल.

  • सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी या एकात्मिक प्रणालीमुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

  • अहवाल प्राप्त झाल्यानंतर या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी सुरू होते, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर करणे, हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. मेट्रो आणि पीएमपी सेवा एकमेकांना जोडल्या गेल्याने प्रवाशांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार आहे. सध्या नियुक्त केलेल्या कंपनीमार्फत या एकत्रित तिकीट प्रणालीकरिता तांत्रिक आणि व्यावहारिक बाबींचा सखोल अभ्यास सुरू आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, दोन्ही यंत्रणांच्या तिकीट प्रणालीचे एकत्रीकरण करून एकच तिकीट किंवा क्यूआर कोड असलेला पास ही संकल्पना आम्ही प्राधान्याने आणि अत्यंत वेगाने प्रत्यक्षात आणणार आहोत.
महेश आव्हाड, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT