Pune Metro Car Shed Pudhari
पुणे

Pune Metro Car Shed: पुणे मेट्रोच्या कारशेडचा मार्ग मोकळा होणार? खडकवासल्यातील २० हेक्टर जागेचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाकडे

सीडब्ल्यूपीआरएसच्या जागेसाठी केंद्र सरकार सकारात्मक; खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी मेट्रो मार्गिकेच्या कारशेडचा प्रश्न सुटण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) चौथ्या टप्प्यातील खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी या मार्गिकेच्या कारशेडसाठी आवश्यक असलेल्या जागेचा निर्णय आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या हाती गेला आहे. खडकवासला येथील केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्राच्या (सीडब्ल्यूपीआरएस) आवारातील २० हेक्टर जागा मेट्रो कारशेडसाठी देण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे केंद्रीय जलशक्तिमंत्री सी. आर. पाटील यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

सीडब्ल्यूपीआरएस आयोजित 'इंटिग्रेटेड रिव्हर, रिझर्व्हायर अँड डॅम सिस्टम्स' या राष्ट्रीय परिषदेचे केंद्रीय जलशक्ती मंत्री पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी या ३१.६४ किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकेसाठी खडकवासला येथे कारशेड प्रस्तावित आहे. या मार्गावर २८ स्थानके असून, प्रकल्पाचा खर्च ९ हजार ८९७ कोटी रुपये निश्चित करण्यात आला आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये राज्य सरकारने या मार्गिकेला मंजुरी दिली आहे. मात्र, कारशेडसाठी आवश्यक जागेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

महामेट्रोने सीडब्ल्यूपीआरएसच्या आवारातील २० हेक्टर जागेची मागणी ऑक्टोबर २०२४ मध्ये केली होती. जून २०२५ मध्ये स्मरणपत्रही पाठविले. मात्र, संस्थेने हा प्रस्ताव नाकारला. त्यानंतरही पत्रव्यवहार सुरू राहिला; परंतु तोडगा निघाला नाही. अखेर हा विषय केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे पोहोचला. आता जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवून मंजुरी घेतली जाईल, असे पाटील यांनी सांगितले.

सीडब्ल्यूपीआरएस'च्या जागेचा वापर मेट्रो प्रकल्पासाठी करण्यासाठी आवश्यक जागेचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. जागा हस्तांतरणासाठी हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेऊन मंजुरी घ्यावी लागेल.
सी. आर. पाटील, केंद्रीय जलशक्तीमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT