पुणे: कल्याणीनगर ते पुणे विमानतळ या मेट्रो मार्गावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत शिक्कामोर्तब केले. काही महिन्यांपूर्वी या मार्गांबाबत विविध पर्याय देण्याचे निर्देश मोहोळ यांनी मेट्रो प्रशासनाला दिले होते. यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व मेट्रो मार्ग थेट विमानतळाला जोडले जाणार आहेत. तसेच, वनाज ते चांदणी चौक या विस्तारित मेट्रो मार्गावर पौड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कचरा डेपोपासूनच दुहेरी उड्डाणपूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गाचा सुधारित आराखडा लवकरच तयार करण्याच्या सूचना मंत्री मोहोळ यांनी मेट्रो प्रशासनला दिल्या आहेत. शिवाय, मेट्रोसंदर्भातील विविध कामांमधील बदल करण्याचे आणि वेग देण्याचे निर्देश मोहोळ यांनी दिल्याने मेट्रोच्या विविध मार्गांच्या कामांना गती येणार आहे.
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे मेट्रो भवन येथे मेट्रोच्या विविध प्रकल्पांबाबत नागरिकांच्या सूचना जाणून घेत बैठकीत निर्देश दिले. या वेळी पुणे मेट्रो आणि पुणे महापालिका यांच्या संयुक्त समन्वयातून राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ, संचालक विनोदकुमार अग्रवाल, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, नगरसेवक, स्थानिक नागरिक, तसेच अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत वनाज ते चांदणी
चौक मेट्रो विस्तार मार्गिका आणि त्याअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या दुहेरी उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. स्थानिक नागरिकांची मागणी लक्षात घेत आणि पौड रस्ता वाहतूक कोंडीपासून मुक्त करण्यासाठी कचरा डेपोपासूनच नळ स्टॉपच्या धर्तीवर दुहेरी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे वाहनांची कोंडी दूर होण्यास मदत होणार असून, स्थानिक नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
वर्तुळाकार मार्ग साकारण्यावरही अंतिम शिक्कामोर्तब
पुणे शहराभोवती ३६ किलोमीटर लांबीच्या आणि २४ मीटरपर्यंत रुंदीचा वर्तुळाकार मार्ग साकारण्यावरही अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले असून, या प्रकल्पाची निविदाप्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश मंत्री मोहोळ यांनी महापालिका आयुक्तांना बैठकीदरम्यान दिले. यामुळे या प्रलंबित प्रकल्पाला वेग येणार असून, प्रत्यक्ष कामालाही लवकरच सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे.
शेवाळेवाडी-हडपसर-कात्रज मार्ग चांदणी चौक-वाकडपर्यंत वाढवण्याच्या सूचना
पुणे मेट्रोचा शहराभर विस्तार करत असताना शहराच्या सर्व दिशांना मेट्रोचा विस्तार करण्याच्या दृष्टीने शेवाळेवाडी-हडपसर-कात्रज हा नियोजित मार्ग चांदणी चौक-वाकडपर्यंत वाढवण्याच्या सूचना मोहोळ यांनी मेट्रो प्रशासनास दिल्या आहेत. तसेच या मार्गासाठीचा डीपीआर करण्याचे निर्देशही मोहोळ यांनी मेट्रो प्रशासनास दिले आहे. या मार्गामुळे शहराभोवती मेट्रोचे जाळे निर्माण होण्यास मदत होणार असून, मार्गावरील उपनगरातील नागरिकांना मेट्रोची कनेक्टिव्हीटी उपलब्ध होणार आहे.
पुणे शहराची वाढती लोकसंख्य आणि वाहतुकीच्या गरजा लक्षात घेता मेट्रोचा विस्तार अत्यंत आवश्यक असून, गेल्या काही वर्षांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मेट्रो प्रकल्पामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडून आला आहे. शहराच्या सर्व भागांना तसेच विमानतळासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना मेट्रोद्वारे जोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. नागरिकांचा सार्वजनिक वाहतुकीकडे वाढता कल लक्षात घेता मेट्रो नेटवर्कचा विस्तार अत्यंत आवश्यक आहे.मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री