Metro Double Decker Flyover Pudhari
पुणे

Pune Metro Double Decker Flyover: पुण्यात मेट्रोसह दुमजली उड्डाणपूल; कर्वे पुतळा-आंबेडकर चौकासाठी ४०४ कोटींचा खर्च

कर्वे पुतळा उड्डाणपूल १.६ किमी, वारजेतील पूल ५०० मीटर; मेट्रो व्हायाडक्टच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कोथरूड येथील कर्वे पुतळा आणि वारजे येथील आंबेडकर चौक येथे मेट्रो मार्गिकेसह उभारण्यात येणाऱ्या दुमजली उड्डाणपुलासाठी तब्बल ४०४ कोटींचा खर्च येणार आहे. या दुमजली उड्डाणपुलासह खर्चाचा आराखडा महामेट्रोकडून तयार करण्यात आला असून, या कामातील मेट्रो व्हायाडक्ट्साठी निविदा प्रकिया राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

एसएनडीटी महाविद्यालय ते माणिकबाग या मेट्रोमार्गाला मंजुरी मिळाली आहे. या मार्गावर दोन ठिकाणी दुमजली उड्डाणपुलाचे नियोजन महापालिका आणि महामेट्रो यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यासंबधीचा आराखडा महामेट्रोने तयार केला आहे. त्यात मेट्रोच्या व्हायाडक्टसोबत एकत्रित स्वरुपात दोन्ही उड्डाणपुलांसाठी ४०४ कोटी रुपयांचा प्राथमिक खर्च अपेक्षित आहे. या प्रस्तावात दुमजली उड्डाणपुलाच्या पहिल्या स्तरावर २० मीटर रुंदीचा दोन्ही बाजूंनी दोन लेनचा रस्ता, तर दुसऱ्या स्तरावर मेट्रो मार्गिका असणार आहे.

कर्वे पुतळा उड्डाणपूल १.६ किलोमीटरचा

कर्वे पुतळा चौक येथील प्रस्तावित उड्डाणपुलाची लांबी १. ६ किमी इतकी असणार आहे. हा उड्डाणपूल कर्वे रस्त्यावरील करिश्मा चौक (हनुमान मंदिराजवळ) येथून सुरू होऊन डहाणूकर कॉलनीजवळील हॉटेल मिर्च मसाला परिसरात संपणार आहे. या कामासाठी तब्बल ३२७ कोटी रुपयांचा प्राथमिक खर्च अपेक्षित आहे. या उड्डाणपुलासाठी काही ठिकाणी रस्ता रुंदीकरणाची आवश्यकता भासणार आहे.

आंबेडकर चौकातील उड्डाणपूल ५०० मीटर

आंबेडकर चौक (वारजे) येथील प्रस्तावित उड्डाणपूल ५०० मीटर लांबीचा असून, तो डी-मार्ट चौकापासून सुरू होऊन कॅनॉल रोडच्या ५० मीटर आधी संपणार आहे. या उड्डाणपुलासाठी सुमारे ७७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. उड्डाणपूल उभारल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूंना केवळ सुमारे ५ मीटर रुंदीची जागा उपलब्ध राहणार असल्याने याठिकाणी वाहतूक कोंडीचे आव्हान असेल, असे महामेट्रोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

खर्चात १० टक्क्यांपर्यंत बदल शक्य

महामेट्रोने दिलेला खर्च हा प्राथमिक आहे. निविदांमध्ये मिळणाऱ्या दरांनुसार त्यात सुमारे १० टक्क्यांपर्यंत वाढ-कपात होऊ शकते, असे महामेट्रोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. २०२१ मधील दरांमध्ये २०२६ पर्यंत आवश्यक वाढ गृहीत धरून हा अंदाज तयार करण्यात आला आहे.

मेट्रोच्या निविदा प्रक्रियेलाही सुरुवात

या दोन्ही उड्डाणपुलांशी संबंधित मेट्रो व्हायाडक्टच्या कामासाठी निविदा आधीच मागविण्यात आल्या आहेत. त्यानुसार निविदा दस्तऐवज विक्रीची प्रक्रिया दि. १० सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे. त्यामुळे उड्डाणपुलांच्या कामाला तत्त्वतः मान्यता आणि आर्थिक संमती देण्याची कार्यवाही तातडीने करण्याची विनंती महामेट्रोने महापालिकेकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT