Extortion News Pudhari
पुणे

Pune Contractor Kidnapping: पुण्यात मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; 50 लाखांच्या खंडणीसाठी कट, पाच जण अटकेत

खराडी परिसरातील घटना; पोलिसांची तात्काळ कारवाई, ठेकेदाराची सुटका

पुढारी वृत्तसेवा

पुणे: आर्थिक वादातून मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. खडी क्रशर प्लॅन्टसाठी जागा दाखविण्याची बतावणी करत ठेकेदाराचे अपहरण करून 50 लाखांची खंडणी मागण्यात आली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच खराडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. या प्रकरणात अटक केलेले आरोपी खडी क्रशर (स्टोन क्रशर) चालक आहेत.

सागर दत्तात्रय झुरुंगे (वय 39), विजय सुरेश वाळुंज (वय 38), राजू विजयकुमार सहाणे (वय 32), रूपेश शिवाजी गावडे (वय 38, सर्व रा. लोणीकंद, पुणे-अहिल्यानगर रस्ता), प्रकाश बाळासाहेब राऊत (वय 34, रा. तुळापूर, ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत मेट्रोतील ठेकेदाराने खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सध्या गहुंजे भागात वास्तव्यास असलेले 40 वर्षीय फिर्यादी ठेकेदार मूळचे उत्तर प्रदेशातील कानपूरचे आहेत. आरोपी झुरुंगे याच्याशी त्यांची ओळख झाली होती. ठेकेदाराने झुरुंगेकडून खडी खरेदी केली होती. त्याचे काही पैसे झुरंगे याला देणे बाकी होते. मात्र, बिले पास झाल्यानंतर ठेकेदार त्याला पैसे देतो म्हणाले होते. दरम्यान, खडी क्रशर व्यवसायासाठी जागा दाखवितो, असे सांगून आरोपींनी त्यांना मंगळवारी (14 एप्रिल) खराडी आयटी पार्क परिसरात बोलावले.

तेथील एका कॅफेजवळ ते दुपारी बाराच्या सुमारास थांबले होते. आरोपींनी त्यांना जागा दाखविण्याचा बहाणा करून त्यांना मोटारीतून एके ठिकाणी नेले आणि त्यांच्याकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणाची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, परिमंडळ सातचे उपायुक्त सोमय मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपास करून पसार झालेल्या पाच आरोपींना अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक गोडसे पुढील तपास करीत आहेत.

पैशांसाठी ठेकेदाराच्या वडिलांना फोन

ठेकेदाराच्या वडिलांना फोन करून हे पैसे आरोपींनी मागितले होते. ठेकेदाराच्या वडिलांनी ही माहिती पिंपरी-चिंचवड आणि पुणे पोलिसांना दिली. त्यानुसार खराडी पोलिसांनी आरोपींना अटक करून अपहृत झालेल्या ठेकेदाराची सुटका केली, अशी माहिती खराडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT